अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी ९ कोटी दंड वसूल

287
Adv

जिल्ह्यात काही प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन सुरु होते. गत ७ ते आठ महिन्यांत २२४ कारवाई करत त्यातून ९ कोटींचा दंड वसूल केला आहे. अवैध कामांवर कारवाई करण्याचे काम महसूल, पोलीस, जिल्हा परिषदेसह सर्वच प्रशासनाने सुरु केले आहे. कोणी अवैध कामे करत असेल तर त्यांनी तत्काळ बंद करावीत. अशा कामांवर कारवाई करत असताना कोणी गुंडागर्दी करत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांस त्रास दिला तर सोडणार नाही, असा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला.

जिल्हाधिकारी डूडी यांनी आज अवैध गौणखनिज कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, गौण खनिज अधिकारी थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई केली. २२४ कारवाया करताना १०० वाहनांना दंड करत ९ कोटींचा महसूल वसूल केला आहे. यामुळे यंदा वर्षीचा १०० टक्के महसूल वसुली उद्दिष्ठ पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यात २३४ क्रशर आहेत. त्यांची तपासणी केली असता ५७ क्रशर अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यातील काही कागदपत्रे घेवून रितसर सुरु ठेवले आहेत. उर्वरीत ४३ अनधिकृत असून, ते बंद केले आहेत.

सातारा जिल्हा हा क्रांतीविरांचा जिल्हा आहे. शांतताप्रिय जिल्हा आहे. येथे गुंडागर्दी चालणार नाही. चुकीच्या कामांवर प्रशासन कारवाई करेलच. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय यंत्रणा नियमाप्रमाणे कारवाई करत असतात. त्यांच्यावर कोणी गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास तर त्यांना सोडणार नाही. सर्व कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल. कोठे चुकीचे काम सुरु असेल तर लोकांनी आमच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डूडी यांनी केले.

Adv