Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District साताऱ्यात ‘ईपीएफ’ कार्यालयासाठी प्रयत्न. छ उदयनराजे

साताऱ्यात ‘ईपीएफ’ कार्यालयासाठी प्रयत्न. छ उदयनराजे

347
Adv

साताराः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात् ईपीएफ कार्यालय कोल्हापूर येथे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील वर्गणीदारांची होणारी गैरसोय पाहता, सातारा येथे कार्यालय मंजूर करावे, अशी विनंती खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार तथा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. श्री. यादव यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.
सातारा जिल्ह्यात ईपीएफची वर्गणी भरणाऱ्या ३२०० संस्था असून, ईपीएफमध्ये दरमहा सुमारे १.२५ कोटी रुपयांचा भरणा केला जातो. कर्मचाऱ्यांना छोट्या-छोट्या कामांसाठी कोल्हापूरला जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी साताऱ्यात ईपीएफ कार्यालय मंजूर व्हावे, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे यांनी केली. शंभर खाटांचे ईएसआय रुग्णालय मंजूर केल्याबद्दल श्री. यादव यांना धन्यवाद देण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे यांनी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली. जागेच्या हस्तांतरणाचा विषय राज्य स्तरावर प्रक्रियेत असून, हस्तांतरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांचा मुद्दाही खा. श्री. छ. उदयनराजे यांनी या भेटीदरम्यान उपस्थित केला. येथील ग्रामस्थांना वन्यजीवांचा धोका असून, काही गावांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रश्नी मंत्रालय स्तरावर तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, मंत्री महोदय स्वतः सातारा जिल्ह्याला भेट देणार असून, त्यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Adv