इंग्रजीमुळे मराठी वाचनाचे प्रमाण कमी – ज्येष्ठ संपादक मंदार जोशी

259
Adv

सातारा प्रतिनिधी – सध्याची नवीन पिढी इंग्रजी शिक्षण घेत असल्यामुळे मराठी वाचनाचे प्रमाण फार कमी झाले असल्याची खंत तारांगण मासिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार मंदार जोशी यांनी व्यक्त केली.

  सातारा नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी (सातारा) व नगर वाचनालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरावड्या निमित्त आयोजित गप्पांची मैफिल मध्ये ते बोलत होते. यावेळी संवादक साहित्यिक राजेंद्र माने, शिरीष चिटणीस , महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जनता सहकारी बँकेचे संचालक आनंदराव कणसे, नगरसेवक अविनाश कदम, जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काका पाटील महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी म्हणाले,महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून जाहीर केला.तेव्हा पासून साताऱ्यात मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा करत असते असे त्यांनी यावेळी सांगितले.

नगरसेवक अविनाश कदम म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जे निकष आहेत ते निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. परंतु राजकारणी मंडळींना मराठी भाषेविषयी आकस आहे का? जर अन्य सहा भाषांना दर्जा मिळू शकतो तर मराठीला का नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी  आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

यावेळी मंदार जोशी यांच्या  चित्रपट सृष्टीतील पत्रकारीतेतील प्रवास राजेंद्र माने आणि शिरीष चिटणीस यांनी मोजक्या प्रश्नांमधून उलगडला.

मंदार जोशी म्हणाले, मराठी चित्रपट सृष्टीत मुंबई बरोबरच साताऱ्याचे योगदान मोठे आहे मी ज्यावेळेस पत्रकारितेत आलो त्यावेळेस चित्रपटांची माहिती देणारे एकही मासिक नव्हते. मुळे मी तारांगण मासिक सुरू केले मासिक सुरू करताना खूप अडचणी आल्या यावेळी मला कुटुंबाची चांगली साथ मिळाली. मी काम करत असताना मला चित्रपट सृष्टीचे वेगवेगळे अनुभव आले. मी आत्तापर्यंत ज्या चरित्रांचे शब्दांकन केले त्या त्या व्यक्तींनी मला खूप साथ दिली आपण ज्याचे चरित्र लिहितो त्याच्या अंतरंगात आपल्याला शिरावे लागते तेव्हाच त्या व्यक्तीचे आत्मचरित्र आपण चांगले शब्दांकित करू शकतो. युवा पिढीने वाचनाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे  काळाची पावले ओळखून पुढे गेले पाहिजे कुठलेही क्षेत्र  असो लोक काय म्हणतील हा विचार न करता पुढल्या काळात येणारे बदल आपण स्वतः करणे गरजेचे आहे आयुष्याला सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार मंदार जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले.

चौकट
शनिवारी 11 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सहस्त्रकातील साहित्यिका अमृता प्रीतम एक आगळावेगळा साहित्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संहिता व सादरीकरण मुंबई येथील श्रद्धा वझें या करणार असून या कार्यक्रमात प्रकाश पायगुडे,जयवंत भोसले,वैदेही कुलकर्णी, रवींद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

Adv