Thursday, April 2, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पोट निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

पोट निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

114
Adv

कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.26) मतदान होणार असून प्रचाराची सांगता आज (दि.24) सायंकाळी होणार आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत होत असल्याने, या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप या पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावणार आहे.

मागील दोन आठवड्यांपासून मेळावे, प्रचारसभा, कोपरासभा, रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटी याद्वांरे निवडणुकीचे रण तापविणाऱ्या राजकीय पक्षांसाठी प्रचाराची मुदत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता समाप्त होत आहे. यानंतर पुढील काही तास डोळ्यात तेल घालून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गुप्त हालचाली टिपण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात आहे. मात्र मुख्य लढत ही कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात होत आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत होत आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही पोटनिवडणुक महाविकास आघाडी व भाजप यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीच्या निकालावर पुढील राजकीय वाटचाल व मतदारांच्या कौल लक्षात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत प्रचाराला ताकदीनिशी उतरल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडून प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांच्या सभा, रॅली व पदयात्रेने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न झाला.

दुसरीकडे कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्‍वजित कदम आदींनी सभा घेतल्या. या नेत्यांच्या प्रचारामुळे कसबा पेठेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

Adv