मोठा सोन्या, बकासूरची बैलजोडी ‘सेवागिरी हिंदकेसरी’

308
Adv

महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखो बैलगाडी शर्यत शौकीनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये सोनारपाडा (मुंबई) येथील रिया जयेश पाटील यांच्या मोठा सोन्या आणि नाथसाहेब प्रसन्न सुसगाव मावळ यांचा बकासूर या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकून ‘सेवागिरी हिंदकेसरी’ किताब पटकावला.
शासनाची परवानगी मिळताच फक्त १२ तासात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी आणि बैलगाडी शर्यत कमिटीने उत्कृष्ट मैदान तयार केले. मंगळवारी येथील दहिवडी रोड शिवराज मंगल कार्याजवळील मैदानात सकाळी १० वाजता मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीला सुरुवात करण्यात आली. शर्यती पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्व फेऱ्यांसाठी चिठ्ठी पध्दतीने लॉट्स पाडण्यात आले. अचूक निकाल पाहण्यासाठी व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते. सर्व नियम व अटींच्या अधिन राहून शर्यतीला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

दुसऱ्या क्रमांकापासून विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे : राजूशेठ म्हासाळ (खेड) आणि पुरंदर केशरी राहूल जगताप, संग्राम उदयसिंह पाटील (ओगलेवाडी), राजवीर सुरेंद्रकुमार जाधव (पुसेगाव), लक्ष्मण (लखन) पाटोळे (कटगुण), उत्तम गवळी (कालगाव), जीवन चव्हाण (निनाम), खाशाबा दाजी शिंदे (सैदापूर, कराड), श्री स्वामी समर्थ (किकवी, भोर), उत्तम गवळी (बदलापूर).
सोमवारी अचानक शर्यतीला परवानगी मिळताच एका रात्रीत मैदान तयार करण्यात आले. रात्रीत महाराष्ट्रासह इतर राज्यातील शर्यत शौकिनांनी पुसेगावची वाट धरली. हजारो वाहनांमधून आलेल्या बैल, बैलमालक आणि प्रेक्षकांनी पुसेगावचे मैदान तुडुंब भरले होते. यावेळी एकापेक्षा एक वरचढ जातीवंत खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार या मैदानात प्रेक्षकांना अनुभवायास मिळाला. स्पर्धेतील प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. ही तीन राऊंड बैलगाडी शर्यत होती. शर्यतीला ५५१ गाड्यांची नोंद होऊन गटाचे ६२ फेरे व सेमीफायनलच्या ८ फेऱ्या पार पडल्या.

शर्यतीमधील प्रथम क्रमांक विजेत्या बैलगाडी मालकाला ७५ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ४१ हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये, सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ११ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. गटाच्या प्रत्येक फेऱ्यातील प्रथम तीन क्रमांकच्या विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे ३००, २००, १०० रुपये तर सेमिफायनलच्या प्रत्येक फेऱ्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडी मालकांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
…………..चौकट…………..

प्रथम विजेतांकडून देणगी अर्पण
बैलगाडी शर्यतीत गट ते फायनल चिट्टी पद्धतीने लॉट्स पाडले गेले. तसेच पारदर्शक निकालामुळे बैलगाडी मालक आणि शौकिनांनी ट्रस्ट आणि यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे कौतुक केले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या गाडी मालक रिया जयेश पाटील व मोहील धुमाळ, अर्णव साळुंखे यांनी बक्षिसाची ७५ हजार रक्कम श्री सेवागिरींच्या चरणी अर्पण केली.

Adv