महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री या संबंधात 3 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत.
बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावांचा कर्नाटकात समावेश करण्यावर महाराष्ट्राने आक्षेप घेतल्याने सन 1953 पासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद सुरू झाला आहे.
ही गावे कर्नाटकच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागात पसरलेली आहेत व सर्व गावे महाराष्ट्र सीमेला लागून आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, 1956 लागू झाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला लागून असलेली सीमेची पुनर्ररचना करण्याची मागणी केली आहे. तर दोन्ही राज्यांनी या वादाच्या संबंधात चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
महाराष्ट्र सरकारने आपल्या हद्दीतील 260 कन्नड भाषिक गावे हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु कर्नाटकने ती नाकारली. आता हे प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, कर्नाटक सरकार या मुद्द्यावर लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार करत आहे.