सातारा दि 21 ( प्रतिनिधी )
पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे सुशोभीकरण केले जाणार असून, पालिकेने या कामासाठी तब्बल १६ कोटी १४ लाखांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. पालिकेच्या प्रशासकीय सभेत या विषयासह अजेंड्यावरील सर्व १४३ विषयांना मंजुरी देण्यात आली.
सातारा पालिकेची प्रशासकीय सभा सोमवारी सायंकाळी चार वाजता पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला नगर अभियंता दिलीप चिद्रे, स्थावर विभागप्रमुख प्रणीता शेंडगे, लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, हेमंत आष्टेकर, महेश सावलकर, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे आदी उपस्थित होते.
सभा सचिव रंजना भोसले यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. एकूण १४२ विषयांचे तपशीलवार वाचन करण्यात आले. मुुख्याधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा केली. चार वाजता सुरू झालेली सभा एका तासातच आटोपती घेण्यात आली. १४२ पैकी बहुतांश विषय हे दर मंजुरीचे होते. त्यामुळे चर्चेअंती सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सातारा पालिकेचा कारभार सध्या प्रशासकीय राजवटीत सुरू आहे. त्यामुळे सभेत नगरसेवकांकडून केला जाणारा गोंधळ अन् आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा वर्षभरापासून थंडावल्या आहेत.
सातारा शहरालगत असलेल्या हत्ती तळे व महादरे परिसराचा केंद्र शासन पुरस्कृत अमृत ग्रीन स्पेस अंतर्गत विकास करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. तसेच जप्त करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंचा सुशोभीकरणासाठी वापर करण्यावर सभेत चर्चा झाली. पालिकेकडून यापूर्वीही प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंचा डांबर निर्मितीसाठी प्रयोग करण्यात आला होता.
(चौकट)
सातारा शहरातील जुन्या इमारती जमीनदोस्त करणे, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, पालिकेकडील फिरत्या शौचालयांची दुरुस्ती करणे, कास तलाव व परिसराचा विकास करणे, सातारा शहर व हद्दीतील हिंदू समाजातील मृत व्यक्तींच्या वारसांना अंत्यसंस्कार अनुदान देणे, सातारा शहरातील पाणी टाक्यांच्या पाइपलाइनमधील पाण्याची तपासणी फ्लो मीटरद्वारे करणे, पालिकेत आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देणे, हद्दवाढ भागात नागरी सुविधा पुरविणे, सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत सामावून घेणे आदी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
बहुचर्चित हद्दवाढीसाठी ४८ कोटींचे आलेले टेडंर बारामतीच्या खञी नामक व्यक्तीला मंजूर झाले असल्याचे समजते