श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुंपातर करणा-या छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक गुरुवार बाग येथे व्हावे यासाठी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती त्यास पालिकेने मंजुरी दिली असून पुढील मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री. छ. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा किल्ले अंजिक्यतारा येथे दि. 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक झाला. त्यानंतर अखंड हिंदुस्थानावर आपली सत्ता त्यांनी प्रस्थापित केली. कारभार करण्यास किल्ल्यावरील जागा अपुरी पडू लागल्यानंतर त्यांनी 1720 ते 1721 रोजी राजधानी शहर वसवून तख्तवाडा, रंगमहाल, अदालतवाडा आदी वास्तू बांधल्या. त्यानंतर त्यांचे वास्तव्य याचठिकाणी असत. अखंड हिंदुस्थानात ज्या वाडयातून हुकुम निघत ती वास्तू म्हणजे तख्तवाडा म्हणजेच सध्याची गुरुवार बाग. याच वास्तूमधून पुढे अनेक वर्षे छत्रपतींनी कारभार पाहिला. अशा परमपवित्र आणि स्फूर्तीदायक जागेमध्ये सातारा शहर संस्थापक छत्रपती शाहू महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे. ज्याठिकाणी छत्रपतींचा राजदरबार भरत असे त्याचठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचे अश्वारुढ स्मारक/मूर्ती स्थापित व्हावी. जगाला प्रेरणा देणारे स्मारक व्हावे, अशी मागणी शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने नगरपालिकेकडे निवेदन देऊन करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेऊन पालिकेने त्यास मंजुरी दिली असून शासनाच्या स्मारक उभारण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार पुढील मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगरपालिका प्रशासन यांचे शाहूनगरी फाऊंडेशनचे वतीने आभार मानण्यात आले…





