कोयनेत आढळला माउंट इंपिरिअल पारवा

178
Adv

कोयना परिसरात अभ्यास दौर्‍यादरम्यान डिस्कव्हर कोयना टीमच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा माऊंटन इंपेरियल पारवा दिसून आला आहे. कोयना परिसरात डिस्कव्हर कोयना टीम अशा विविध पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी तसेच जलचर प्राण्यांचा अभ्यास करते.

पश्‍चिम घाटातील कोयना परिसर हा वेगवेगळ्या जैविविधतेने बहरलेला आहे. येथे आढळणारे पक्षी, फुलपाखरे, साप, सरपटणारे व उभयचर जीव व कीटक यासारख्या सजीवांचा अभ्यास करेल तेवढा कमी आहे. त्यामुळे याविषयी आपल्याला व आपल्यामार्फत समाजाला याची माहिती व उपयोग कळवा यासाठी डिस्कव्हर कोयना टीमच्या वतीने रोज अभ्यास केला जातोय. तसेच आठवड्यातून एकदा दिवसभरासाठी अभ्यास दौरा ही आखला जातो. काल ही अशाच अभ्यास दौर्‍यावरती असताना अचानक या पक्षाचे दर्शन झाले. याला इंग्रजीत माऊंटन इंपेरियल पिजण असे म्हणतात तर शास्त्रीय नाव डुकुला बाडीया असे आहे. या पक्षाची लांबी 43 ते 51 से. मी. एवढी असते. याचे शेपूट लांब असून पंख जाड गोलाकार असतात. याचा अंतर्भाग, डोळे व नाक राखाडी असून, मान पांढरट असते. पंख तपकिरी चॉकलेटी असतात, तर पंखांच्या खलील बाजू फिक्कट राखाडी असते व शेपूट काळसर असते. मार्च ते ऑगस्ट हा याचा विणीची हंगाम असतो. याचे घरटे लहान झाडांवरती 5 ते 8 मीटर उंचीवर असते. त्यामध्ये या पक्षाची मादी 1 अंडे घालते. पण क्वचित प्रसंगी 2 अंडी ही घालतात. या पक्षाचे प्रमुख खाद्य फळे व बेरी हे आहे. हा पक्षी आशियातील भारतासह, बांगला देश, भूतान, बुनया, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाऊस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, थायलंड व व्हिएतनाम या देशात आढळतो. हा पक्षी हिमालायमध्ये 8370 फूट उंचीवरती आढळल्याची नोंद आहे.

याचबरोबर डिस्कव्हर कोयना टीममार्फत आजपर्यत पक्षी, साप मिळून हजारो जीवांचे फोटो व रेकॉर्ड मिळवण्यात आले आहेत. यासाठी पक्षीमित्र संग्राम कांबळे, पक्षीमित्र महेश शेलार, सरपटणारे-उभयचर व कीटक अभ्यासक विकास माने, सर्प अभ्यासक निखिल मोहिते यांच्यासह सर्व टीम प्रयत्न करत आहे.

Adv