Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूनगरी झाली उदयनराजेंमय शहरभर मोठमोठे फ्लेक्स : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

शाहूनगरी झाली उदयनराजेंमय शहरभर मोठमोठे फ्लेक्स : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

506
Adv

छत्रपती घराण्याचे थेट 14 वे वंशज असलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह असंख्य चाहत्यांसाठी खास पर्वणी असते. यावर्षी कोरोना संसर्गामुळे या उत्साहाला मर्यादा आल्या असल्या तरी संपूर्ण सातारा शहर मात्र त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱया मोठमोठय़ा फ्लेक्समुळे बहरुन गेले आहे. पहाल तिकडे उदयनराजेंचे भव्य फोटो दिसत असल्याने सगळी शाहूनगरी उदयनराजेंमय झाली आहे.

गेली अनेक वर्षे खासदार म्हणून जरी महाराष्ट्रातील जनतेला परिचित असले आणि राजकारणातील त्यांच्या परखड विधानांनी ते सतत चर्चेत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश त्यांच्या प्रती आदर व्यक्त करत असतो. विशेषतः तरुणाईला उदयनराजेंच्या धडाकेबाज शैलीचे प्रचंड आकर्षण असून तरुणाई त्यांच्यावर प्रचंड फिदा असते.

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्वजण उदयनराजे यांच्याकडे मोठय़ा अपेक्षांना पहात असतात. राजकारण, समाजकारणात वाटचाल करताना सामान्य माणसांवर राजेपणाच्या पलिकडे जावून प्रेम करणारे आणि दातृत्वासाठी प्रसिध्द असलेले उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीने सगळे वातावरण भारुन जाते. त्यांच्या व्यक्तीमत्वातील बेडरपणा सगळय़ांनाच भावतो. सध्या ते भाजपचे खासदार म्हणून कार्यरत असले तरी आपल्या राजाचा वाढदिवस म्हणून सगळी शाहूनगरी उदयनराजेंमय झाल्याचे चित्र सर्वजण अनुभवत आहेत.

राजेंच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे होणारी अलोट गर्दी होणार नाही. त्यांनी देखील कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नाहीत. प्रशासनाचे नियम पाळून कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उदयनराजेंनी केलेले आहे. मात्र, गर्दी न करता देखील आम्ही त्यांना शुभेच्छा देवू इच्छितो असे म्हणत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी शाहूनगरीत त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लावून आपल्या लाडक्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस असला तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत. मात्र, त्यांच्यावर अफाट प्रेम करणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते त्यांना हृदयापासून शुभेच्छा व्यक्त करत सोशल मिडियासह विविध माध्यमांतून आपले प्रेम व्यक्त करुन गर्दी न जमवताही उदयनराजेंना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून समाजासाठी, सातारा शहरासाठी लोककल्याणाचे काम घडो, अशा शुभकामना देत आहेत.

Adv