केवळ विहित माहीती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटले आहे असा आरोप करण्यापूर्वी नगरसेवक वसंत लेवे यांनी कोरोना काळातील केलेल्या खरेदीबाबत एक नगरसेवक-विश्वस्त या नात्याने माहीती घेणे गरजेचे होते. त्यांना ती माहीती मिळाली नसती तर त्यांनी माझेकडे तक्रार करुन त्याची
शहानिशा करता आली असती. लेवे अण्णा स्वतः आरोग्य सभापती होते. त्यांना कामाची पध्दत माहीती आहे. सवंग प्रसिध्दीसाठी किंवा हस्ते,परहस्ते कोणता ठेका कोणाला मिळाला नसेल म्हणून नगरसेवक वसंत लेवे यांनी अश्या पध्दतीने बिनबुडाचे आरोप केले असावेत.त्यांचे आरोप तथ्यहिन असून, त्यास स्वार्थाची बदबु येत आहे असा घणाघाती प्रतिहल्ला सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी केला आहे.
नगरसेवक वसंत लेवे यांनी केलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. तसेच त्यांना माहीती मिळाली नाही म्हणजे निश्चितच भ्रष्टाचार झाला आहे असा त्यांनी सरळधोपट अर्थ काढुन केलेले आरोप म्हणूनच तथ्यहिन आहेत. त्यांच्या बगलबच्यांना हस्ते परहस्ते कोणता तरी ठेका पाहीजे असेल व तो मिळाला नसेल
म्हणून त्यांनी आरोप केले असावेत असे नमुद करुन, नगराध्यक्षा माधवीताई कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, नगरपरिषदेच्या प्रशासनात मुख्याधिकारी यांचेपासून सर्वांचा सहभाग असतो, प्रशासनाला दिशा देवून, ते चालवणे हे पदाधिका-यांचे काम आहे त्यामुळे प्रशासनावर केलेले आरोप नगरपरिषदेच्या संबंधीत प्रत्येक व्यक्तीबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणारे आहे म्हणून वसंत लेवे यांच्या आरोपांना उत्तर देणे माझी जबाबदारी आहे.बेफाम आरोप करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. स्वतःचे मुसळ दिसत नाही पण दुस-याचे कुसळ लगेच दिसते., त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना बेकायदेशिर किंवा चुकीचे असे काहीच वाटत नाही.
मात्र दुस-या कोणत्याही कामात त्यांना सर्वकाही चुकीचे आहे असा भास होतो. कोणाकोणाच्या पायात साप सोडून अण्णांनी आपली पोळी भाजुन घेतली आहे.त्यामुळे त्यांची विश्वासार्हता आणि अप्पांची पुण्याई संपत चालली आहे.वॉर्डात देखिल त्यांनी अनेकांना अनेक कारणांवरुन अडचणीत आणले आहे. ते फक्त संधीची वाट पहात आहेत.म्हणूनच अण्णांनी जरा पार्टीशी एकनिष्ठ राहुन, पार्टी नियमाप्रमाणे आपले वर्तन ठेवावे.
चव्हाटयावर काही आणायचे असेल तर पुराव्यासह आणा. बिनबुडाचे, बेलगाम,बेफाम आरोप काही करु नये असा नगराध्यक्षा या नात्याने त्यांना सल्ला आहे.
यापूर्वी सार्वजनिक शौचालयाच्या मुता-यां साफ करण्याचे टेंडर कुणाकडे होते, घनकचरा व्यवस्थापनामध्ये कोणाला धनलक्ष्मी प्राप्त झाली. आता त्यांच्याकडे काय काय आहे याबाबत सर्व काही सर्वांना माहीती आहे त्यामुळे वसंत लेवे यांनी भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करुन आरोप करावेत असा इशारा देखिल नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी दिला आहे.