करोना संसर्ग आटोक्यात येत असताना आता ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणारी विमानसेवा देखील केंद्र सरकारने रद्द केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे. यासंबंधीचा राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यानुसार, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर सर्वत्र विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या करोनाच्या संसर्गाचा वेग 70 % जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. यामुळे अमेरिका आणि युरोप खंडातील लोक कठोर लॉकडाऊन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात असे घडू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे टोपे यांनी सांगितले.






