ऐतिहासिक सातारा शहरातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व म्हणजे सुहास राजेशिर्के. समाजातल्या, विविध स्तरातल्या गरजू आणि होतकरू समुहाला जसे शक्य होईल त्यापध्दतीने त्यांना help hand देण्याचा त्याचा स्वभावधर्म सर्वश्रूत आहे. या स्वभावधर्माला कोणत्याही परिस्थितीत ठेच पोहचणार नाही याची ते आजवर काळजीही घेत आलेत. विशेष म्हणजे ही काळजी घेत असताना आपण काहीतरी वेगळे केलंय वा करतोय असा ‘भाव’ ते कधीच स्वतःच्या चेहऱ्यावर उमटू देत. निर्मळ मन, स्वच्छ प्रतिमा, निस्वार्थभाव, कल्याणभाव, निष्कलंक चारित्र्य अन् सुसंस्कृतपणा हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे लखलखीत अलंकार आहेत.
न थकणारं, न थांबणारं एखादं वादळ जसे असते तसे सतत कार्यमग्न राहण्यात त्यांना विशेष ऋची आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन माणूसकी जपण्याची जी नितीमूल्ये असतात ती जपत सतत कुशल कर्म करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड कशी करावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुहास राजेशिर्के होय ! अतिवृष्टी असुदेत, कोरोना असुदेत किंवा अन्य कोणतीही परिस्थिती असुदेत अडचणसमयी ते त्या ठिकाणी असणारच. गावचे सरपंच, शहराचे नगराध्यक्ष, महानगराचे महापौर असल्या खूर्च्या असो किंवा नसो ज्यांच्या रक्तातच समाजाबद्दलची आस्था असते ते कोणत्याही पदापेक्षा स्वतःच्या कार्यावर जास्त निष्ठा ठेवतात. पद, सत्ता, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी त्यांच्या ठायी गौण असतात. सुहास राजेशिर्के यांच्याबाबतही असेच आहे. त्यांनी आजवर जे काय कार्य केले किंवा करत आहेत ते त्यांच्या निरपेक्ष आंतरिक ऊर्जेतून.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी शोधून इतिहासाला पूनःर्जिवीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य सुहास राजेशिर्के यांनी केले आहे. खरेतर त्यासाठी ते जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या सहकार्याने तीनचार वर्षे ऐतिहासिक संदर्भ आणि तत्सम बाबींवर संशोधन करत होते. सर्व इतिहासकालीन पुरावे उपलब्ध करून त्यांनी येसुबाईंचे समाधी स्थळ राज्य संरक्षित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपूरावा केला. दीड – दोन वर्षे मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. अखेरीस त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. महाराष्ट्र सरकाराने येसुबाईंच्या समाधीबाबत अधिकृत अधिसूचना काढून समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नामुळे अधिसूचना निघाली तेव्हा साताऱ्यात अनेकांनी फटाके फोडले, पेढे वाटले आणि समाधीस्थळी जाऊन सातारकरांनी वंदनही केले. महाराणी येसुबाई यांची समाधी शोधून काढल्याबद्दल त्यांचा मुबई वाशी येथे विष्णूदास भावे नाट्यगृहात केंद्रिय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले.
जलमंदीर, अदालतवाडा, सुरुची ही तिन्ही ठिकाणं सुहास राजेशिर्के यांच्यासाठी दैवतासारखी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यात आणि छत्रपतींच्या स्वराज्याचे निष्ठापूर्वक रक्षण करण्यात तत्कालीन राजेशिर्के घराणे कधीही मागे हटले नव्हते. हाच वसा आणि वारसा सुहास राजेशिर्के आज चालवत आहेत. मध्यंतरी छत्रपती संभाजीराजे या मालिकेत चूकीचे संदर्भ दाखवून इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सुहास राजेशिर्के यांनी महाराष्ट्रभर आवाज उठवून विपर्यास करणाऱ्यांना धारेवर धरत ‘ट्रॕक’ वर आणले. सातारच्या नगरवाचनालयाला छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे नाव देण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हा तर आजही सातारकर विसरलेले नाहीत. वास्तविक अनेकजण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती या पदाच्या खुर्च्यासाठी आक्रमक होत असतात. इथे मात्र ज्या प्रतापसिंह महाराजांनी सातारा नगरी समृध्द केली त्या प्रतापसिंह महाराजांच्या नावासाठी सुहास राजेशिर्के उसळून पुढे आलेले पहायला मिळाले. हे निश्चितपणे राजघराण्याप्रती असणाऱ्या नितांत आदरभावाचेच ढळढळीत लक्षण होय ! गतवर्षी सातारा नगरीत गेली अनेक वर्षापासून छत्रपतींचा ऐतिहासिक शिवकालाची आठवण करून देत असलेले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नव्या भव्यदिव्य वास्तुत विराजमान झाले. या संग्रहालयाला चांगले स्वरुप प्राप्त व्हावे यासाठी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार राजेशिर्के सतत झटत राहिले. त्यामुळे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहायलयात पहिल्यांदा शिवरायांची जयंती साजरी झाली. तिथे असणारे ऐतिहासिक तख्त पहिल्यांदा सातारकरांना डोळे भरून पाहता आले, त्यास वंदन करता आले. आकर्षक विद्युत रोषणाई आणि शिवाजी महाराजांचा तो इतिहास डोळ्यात – मनात साठवूनच सतारकर संग्रहालयातून बाहेर पडत होते. गर्दीत जो तो सुहास राजेशिर्के यांना धन्यवाद देत होते. राजेशिर्के मात्र सर्वांना सांगत होते खा. उदयनराजे महाराज यांच्या आशिर्वादामुळे हे सारं घडले आहे. आजवर जे काही कार्य सुहास राजेशिर्के यांच्या हातून घडले त्यासाठी ऊर्जा, प्रेरणा आणि आशीर्वाद श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून त्यांना मिळाली.
खरेतर सुहास राजेशिर्के यांची काम करण्याची पध्दत, समाजाप्रती असणारी बांधिलकी वाखाण्याजोगी आहे. शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करणाऱ्या खिरखिंडीतील विद्यार्थ्यांच्यासाठी राजेशिर्के यांनी घेतलेली भूमिका याची दखल परदेशातील लोकांनी घेतली आणि त्यांच्या हेल्पहँडची वाहवासुध्दा केली. त्यामुळे झाले असे, शासन, मंत्री यांनीही विद्यार्थ्यांसाठी बोटीची व्यवस्था करण्यासाठी धाव घेतली. माध्यमांचाही यात महत्वाचा रोल होताच. अर्थात, हे सारं सांगण्याचं कारण असे, सुहास राजेशिर्के यांची कार्यपध्दत ही राजकारणाच्या पलिकडे जाऊन कल्याणभावना जपणारी माणुसकी समृध्द करणारी अशी आहे. त्याचे हे कुशल कर्म आणि एकूणच त्यांची धडपड यापुढे अशीच दमदारपणे सुरू रहावी आणि त्यासाठी ऊर्जा मिळत जावी, अशा भावनांसह जन्मदिनाच्या त्यांना मनःपूर्वक आभाळभर हार्दिक शुभेच्छा !