रविवार पेठ सातारा येथील जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षापासून बेकायदेशीर रित्या बंद असून येथे 35 लाख रुपयांचा अपहार झाला आहे . पतसंस्थेचे चेअरमन विलास आंबेकर व तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह चार शासकीय अधिकाऱ्यांची संगनमताने आर्थिक अनियमिततेचे प्रकरण दडपणे या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत . सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एक महिन्यात सादर करावयाचा आहे .
अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली . माजी नगरसेवक विलास आंबेकर यांच्या जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक अनियमिततेची त्यांनी कागदपत्रांच्या आधारे पोलखोल केली . ते पुढे म्हणाले तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर , जिल्हा विशेष लेखापरिक्षक विजय सावंत , विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर , लेखापरिक्षक अनिता अटक , आणि लिपिक उन्नती मोटे यांनी जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन विलास आंबेकर यांच्याशी संगनमत करून35 लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरण परस्पर दडपले . या प्रकरणी मी 25 जून 2018 मध्ये मी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली होती . गैरव्यवहाराचे परीक्षण करणाऱ्या अनिता अटक पुर्नलेखा परिक्षणाच्या नियुक्ती साठी विलास आंबेकर यांनी लेखी हरकत घेतली . विभागीय सहनिबंधकाकडे तक्रार दाखल केल्यावर अष्टेकर यांनी आपले पूर्वीचे आदेश रद्द करून पुन्हा रानडे यांची लेखापरिक्षणासाठी नियुक्ती केली . या प्रकरणात चेअरमन व सहकार विभागाचे अधिकारी यांनी प्रोसेडिंग मध्ये परस्पर ठराव घुसडणे , बेकायदेशीर सभेचे ठराव तयार करणे व कर्जप्रकरणाची कागदपत्र नष्ट करणे यासारखे गंभीर प्रकार घडविले आहेत . 22 जुलै 2020 रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून सुद्धा कोणतीच कारवाई न झाल्याने जिल्हा न्यायालयात आपण खाजगी फौजदारी खटला दाखल केला . जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांच्या सह पाच सहकार विभागाचे अधिकारी व पतसंस्था चेअरमन विलास आंबेकर यांची सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत . जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे 868 सभासद असून गेले वर्षभर ही पतसंस्था बेकायदेशीर रित्या बंद आहे . संस्थेची उलाढाल एक कोटी 25 लाखाच्या घरात असून सव्वाकोटी चे कर्जवाटप आहे . आंबेकर यांचे सर्व नातेवाईकच संचालक मंडळाचे सदस्य असून त्यातील काहींनी राजीनामा दिला आहे तर काही मयत झाले आहेत . जयभवानी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणाची तड लावण्याचा इशारा माळवदे यांनी दिला आहे