सोनगाव- कुमठे रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी ७ कोटी ३० लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

499
Adv


सातारा- सातारा तालुक्यातील सोनगाव ते कुमठे, आसनगाव या मार्गावर उरमोडी नदीवर असणारा पूल छोटा आणि जुना असल्याने मोठ्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीला असुरक्षित आणि धोकादायक ठरत होता. या मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि दळणवळण सुलभ होण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून उरमोडी नदीवर नवीन मोठा पूल बांधण्यासाठी नाबार्ड २७ अंतर्गत तब्ब्ल ७ कोटी ३० लाख ८६ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

सातारा शहरातून बोगद्याच्या पलीकडे सोनगाव पासून शेळकेवाडी, भाटमरळी, पुढे कुमठे, आसनगांव आणि परिसरातील गावे राज्य मार्ग १४० ते सोनगाव, कुमठे, आसनगाव (प्रमुख जिल्हा मार्ग ३१) या रस्त्याने सातारा शहराला जोडली गेली आहेत. सोनगाव ते कुमठे, आसनगांव या रस्त्यावर शेळकेवाडीजवळ उरमोडी नदीवर जुना पूल असून हा पूल छोटा व अरुंद असल्याकारणाने अवजड व मोठ्या वाहनांसाठी धोकादायक ठरत होता. तसेच पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी लागते, त्यामुळे याठिकाणी नवीन मोठा पूल बांधणे अत्यावश्यक झाले होते.

यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून नवीन पुल बांधण्याच्या कामासाठी नाबार्डमधून प्रशासकीय मान्यता मिळवून या कामाला ७ कोटी ३० लाख ८६ हजार रुपये निधी मंजूर घेतला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून नवीन पूल उभारणीस प्रारंभ होणार आहे. हा नवीन पूल कमानी पद्धतीचा आणि मोठा असणार आहे. त्यामुळे नदीपलीकडील शेळकेवाडी, भाटमरळी, आसनगांव, कुमठे आदी सर्वच गावाना याचा फायदा होणार आहे. तसेच पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर बंद होणारी वाहतूकही नवीन पुलामुळे सुरळीत होऊन दळणवळण सुकर होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Adv