नागठाणे ता.०६ :- श्री क्षेत्र भरतगाववाडी ता.सातारा येथे शनिवार १० सप्टेंबर रोजी ग्रामदैवत श्री गजानन भंडारा यात्रेनिमित्त श्रींची भव्य रथयात्रा पार पडणार आहे. “एक गाव, एक गणपती” म्हणून यंदाचे या उत्सवाचे २३१ वे वर्ष असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे ५१ वे वर्ष आहे. गेले दोन वर्ष संपूर्ण जगात फैलावलेल्या कोरोना महामारीमुळे तसेच शासनाचे निर्बंधामुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाही ? परंतु यंदा कोरोना महामारीचे संकट दूर झालेमुळे हा उत्सव प्रचंड उत्साहात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांना ग्रामस्थ भरतगाववाडी यांचेवतीने सातारी कंदी पेढ्यांचा यथेच्छ प्रसाद आणि सोबतच पुरणपोळीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
यात्रेनिमित्त मागील रविवारपासून सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यामध्ये पहाटे ४ ते ६ श्रींची काकड आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन तसेच ६ ते ७ हरिपाठ तसेच आरती, रात्री ८ ते ११ कीर्तन आणि रात्री २ वा.पर्यंत हरिजागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बुधवारी प्रख्यात महिला कीर्तनकार ह.भ.प.शिवलीलाताई पाटील (बार्शी) तसेच गुरुवारी ह.भ.प.माऊली महाराज पठाडे (कर्जत) आणि शुक्रवारी ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज (बुलढाणा) अशा थोर, ज्ञानी, महंत दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवार दि.१० सप्टेंबर भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ ते ११ पर्यंत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज गोजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झालेनंतर हरीजागरामध्ये दुपारी १ वा.सुमारास श्रींची रथामधून भव्य मिरवणूक केली जाईल तदनंतर सायंकाळी ५ वा. सुमारास मानाचे श्रींची मूर्तीचे विसर्जन होईल आणि तिथून पुढे रात्री ९ वा.पर्यंत आलेल्या सर्व भाविक भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सदर कीर्तन सेवेचा आणि महाप्रसादाचा पंचक्रोशीतील आणि सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ श्री क्षेत्र भरतगाववाडी आणि गावचे सुपुत्र तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर यांनी केले आहे….!