सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील ६४ एकर जागा देण्यात आली आहे. इमारत बांधकाम आता सुरु होईल. इमारत पूर्ण होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षासाठी मेडिकल कॉलेजची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करा अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना वैधकीय शिक्षणाची कवाडे खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ना. पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, विधान भवनात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसंदर्भातील बैठक झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (व्हीसीद्वारे), आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींसह सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी २०१२ मध्ये साताऱ्यासाठी ४१९ कोटी खर्चाचे, १०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नाही. सातारा शहरवासियांची आणि जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत शहरालगतची कृष्णनगर येथील जलसंपदा विभागाची ६४ एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा निर्णय झाला. बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील ७० एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्या (३ जुलै) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथं मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यास मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
दरम्यान, जागेचा प्रश्न सुटला आहे आणि इमारत बांधकामही सुरु होईल. इमारत पूर्ण होईल तेव्हा होईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मेडिलकल कॉलेज सुरु करावे. माझ्या मागणीनुसार त्यासाठीची पदनिर्मिती आणि पदश्चिती यापूर्वीच झाली आहे. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची वैधकीय शिक्षणाची आवड आणि निकड लक्षात घेता चालू शैक्षणिक वर्षांपासून मेडिकल कॉलेज सुरु करावे आणि तात्काळ प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार आगामी शैक्षणिक वर्षांपासून प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करावी. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही सातारावासियांची सर्वात मोठी गरज असून यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, असा विश्वास देत असतानाच, जिल्ह्यातील उपलब्ध आरोग्य यंत्रणा उपयोगात आणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी बैठकीत दिले.
*कोरोनाप्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचला*
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची तयारीही उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवली.