Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Khatav झेंडा मिरवणूकीने पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेला सुरुवात

झेंडा मिरवणूकीने पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेला सुरुवात

254
Adv

श्री सेवागिरी महाराज की जय ` चा गजर करत काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीनंतर झेंड्याची यात्रास्थळावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध शाळांच्या सहकार्याने सेवागिरी देवस्थान ट्रस्टने विविध सामाजिक प्रश्नांबाबात सामाजिक प्रबोधनाचा स्तुत्य उपक्रम राबविला.

श्री सेवागिरी महाराजांच्या ७५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आजपासून ( दि. १७ ) ते ( दि. २७) दरम्यान ही यात्रा भरणार आहे. आज सकाळी नऊ वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त डॉ. गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीरात्र जाधव, ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगनशेठ जाधव, सुरेशशेठ जाधव, शिवाजीराव जाधव, बाळासाहेब जाधव, अंकुश पाटील, सुसेन जाधव भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मंदिराच्या प्रांगणात हनुमानगिरी हायस्कूल, सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला. राधाकृष्ण इंग्लिश मिडीयम , तसेच विविध प्राथमिक शाळांचे विद्यार्थी जमलेले होते. सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे पाण्याचा काटकसरीने वापर, स्वच्छतेचे महत्व, वृक्षारोपण, बेटी बचाव या सामाजिक प्रश्नाची जागृती करणारे फलक तयार करण्यात आले होते. विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे फलक हातात घेऊन त्याबाबतच्या घोषणा देत समाजजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबविला. या मिरवणुकीत पुसेगाव व परिसरातील विविध गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

पालखीच्या पाठीमागे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक पालखीचे दर्शन घेत होते. छत्रपती शिवाजी चौकात विविध शाळांच्या झांज व लेझीम पथकांनी आकर्षक खेळ सादर केले. दुपारी पाऊण वाजता मिरवणूक यात्रास्थळावरील ट्रस्ट कार्यालयाजवळ आल्यावर तेथे झेंड्याची पारंपरिक पध्दतीने मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

झेंडा प्रतिष्ठापनेने २७ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या या यात्रेला प्रारंभ झाला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे पीएसआय बाळासाहेब लोंढे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतूकीचे योग्य नियंत्रण केले. दरम्यान यावर्षी यात्रेनिमित्त यात्रास्थळावर विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. अनेक मनोरंजनाची साधनेही उपलब्ध झाली आहेत.

परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे एसटी महामंडळातर्फे यात्रा कालावधीत जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

Adv