कोरोनाचे वाढती रुग्णसंख्येचा आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांवर प्रचंड ताण असताना, रहाट-गाडगं तर
चाललं पाहीज ते संपूर्ण बंद करुन तर चालणार नाही. हातावरचे पोट असलेला जगला पाहीजे परंतु कोरोनाचा
प्रादुर्भावसुध्दा आटोक्यात राहीला पाहीजे अश्या चक्रव्युहामध्ये अडकलेल्या जिल्हाप्रशासनाचा कप्तान, स्थितप्रज्ञता आणि
स्थिरबुध्दीने निर्णय घेवू शकला म्हणूनच फक्त २९ दिवसांत सातारचे जंबो कोविड रुग्णालय उभारण्यासह अन्य महत्वाचे
निर्णय ते घेवू शकले. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या आव्हानांचा सामना निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या प्रशासकीय कार्यशैलीबददल त्यांचे मनापासून अभिनंदन करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो अश्या गौरवपूर्ण शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्री.शेखर सिंह, यांचा सन्मानचिन्ह, आणि श्रीमंत योगी या पुस्तकाची प्रत देवून अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी शेखरसिंह आले आणि काही दिवसांतच कोरोनामुळे आरोग्याशिवाय सर्व कामकाज जवळजवळ
ठप्प झाले. दुकाने,आस्थापना, कारखाने, इतर सर्व क्षेत्राचे व्यवहार चालु ठेवणे, बंद ठेवणे, याविषयी जनतेमध्ये मतमतांतरे असताना, स्वतःसह आपल्या हाताखालील सर्वांची काळजी घेत, कोणताही निर्णय घेणे केवळ अवघड असते. अश्यावेळी जास्तीत जास्त नुकसान कसं टाळता येईल या एकाच प्रश्नाचे जे चांगल्या प्रमाणात उत्तर मिळेल ती कार्यवाही करावी लागते. असे करताना काही वेळा रोष पत्करावा लागतो. टिका सहन करावी लागते. या सर्व प्रक्रीयेतुन जाताना वैद्यकीय उपचाराविना माणुस गेला असे होवू नये म्हणून कोरोनाच्या वाढत्या काळात जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी फक्त २९ दिवसांत कोरोना रुग्णालय उभारले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या एकूणच कार्याबददल त्यांचे अभिनंदन जर आम्ही केले नाही तर ते कोतेपणाचे ठरेल म्हणूनच आज त्यांचे अभिनंदन करताना मनस्वी समाधान वाटते असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी श्रीमंत योगी या पुस्तकाच्या प्रतीचा आणि सन्मानचिन्हाचा नम्रतापूर्वक स्विकार केला. यावेळी सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक अॅड.डि.जी.बनकर,अक्षय मतकर, अँड.विकास पवार,बाळासाहेब ननावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.