
उरमोडीधरण (मोठा प्रकल्प) प्रकल्पाच्या कामांसाठी रुपये 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित तांत्रिक समितीच्या प्रस्तावास भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मुल्यांकन संघटन यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती येवून, डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल. उरमोडी मोठया प्रकल्पामुळे सातारा जिल्हयातील दुष्काळी माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील एकूण सुमारे 27750 हक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून, प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकरी सुखावणार आहे. अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा हा तसा अत्यंत मिश्र भुमीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हयाच्या पश्चिम भागात पावसाचा सुकाळ तर जिल्हयाच्या पूर्व भागात दुष्काळ अशी विचित्र परिस्थिती आपल्याला पहायला मिळते. गेली अनेक दशके, माण, खटाव, कोरेगांवचा आणि खंडाळा तालुक्याचा काही भाग हा अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला गेला आहे. या भागातील बळीराजावर दुष्काळाचा ठपका लागलेला होता. दुष्काळी भागातील दुष्काळ समाप्त करण्यासाठी आम्ही समाजकारणात आल्यापासून सुरुवात केली. सर्व प्रथम कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना, महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे पाणी अडवून ते सिंचनासाठी वापरण्याचे नियोजन राज्यशासनाच्या माध्यमातुन करण्यात आले. त्याच वेळी पश्चिमभागातील उरमोडी नदीवर उरमोडी धरणाचे पाणी कण्हेर जोड कालव्याव्दारे व पुढे उरमोडी उपसा योजनेअंतर्गंत वाठार किराली व कोंबडवाडी येथे दोन टप्यात 450 फुट उचलून, खटाव व माण तालुक्यातील दुष्काळी भागास सिंचन सुविधा पुरविणेच नियोजन आहे. त्याकरीता रुपये 1417.19 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती. तसेच 2018 साली उरमोडी प्रकल्पाचा समावेश केंद्रसरकारच्या बीजेएसवाय या योजनेमध्ये करण्यात आला. 1417.19 कोटीच्या मान्यतेच्या मर्यादा असल्यामुळे नंतरच्या काळात केंद्राचा निधी मिळणेमध्ये मर्यादा येणार होत्या.
याबाबतीत उरमोडी मोठया प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी आम्ही काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री ना.श्री. सी. आर.पाटील यांची भेट घेवून मागणी केली होती. तसेच याकामी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पार्श्वभुमीवर नुकतीच केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मुल्यांकन संघटनची बैठक जलशक्ती मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सन 2023-24 च्या किंमत पातळीनुसार रुपये 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित किंमत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
या मान्यतेमुळे आता उरमोठी मध्यम प्रकल्पांतर्गत होणा-या विविध कामांसाठी केंद्राचा निधी नियमित आणि सुलभ उपलब्ध होणार असल्याने, प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती मिळून हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यत पूर्णत्वास जाण्यास सहयोग मिळणार आहे. त्याबरोबरीने माण, खटाव आणि सातारा या तालुक्यातील अनुक्रमे 9725 हेक्टर, 9725 हेक्टर आणि 8300 हेक्टर असे एकूण 27750 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. साहजिकच दुष्काळी तालुक्याचा लागलेला ठपका निघुन जाण्याबरोबरच येथील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे याचे आत्मिक समाधान आहे. याकामी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्तीमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस इ मान्यवरांच्या मिळलेल्या सहाकार्याबदद्ल दुष्काळग्रस्तांच्या वतीने आम्ही विशेष आभार मानतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.