कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा गरज करत वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, सध्या जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने पालखी सोहळा रद्द करण्यात आला .
दरम्यान, पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे. राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होत. मात्र आता प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
पायी पालखी सोहळा रद्द करताना शासनाकडून प्रमुख संतांच्या पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपूरला आणण्यात येण्याची चर्चा झाली. त्यानंतर सरकारकडून एसटी महामंडळाच्या वतीने बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे ही बससेवा विनामुल्य असल्याचा समज झाला होता. परंतु सोमवारपर्यंत शासनाकडून कसलेही आदेश प्राप्त झाला नव्हता.
निवृत्तीनाथ महाराज संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आली. दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी,अशी विनंती केलेली होती. महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शविली. अखेर संस्थानने ७१ हजार प्रवासभाडे भरल्यानंतर शिवशाही बस उपलब्ध झाल्याचं संस्थांनचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले.