सातारा पोलीसांच्या सागरिका कॅन्टींचा अभिनव प्रयोग राज्यभर राबविणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

88
Adv

 सातारा पोलीस दलामार्फत सुरु असलेल्या सागरिका पोलीस कॅन्टीनमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या अभिनव अशा इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री दालनामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 45 ते 50 टक्क्यापर्यंत सुट मिळत आहे यामुळे त्यांना आर्थिक मदत होत असल्याने सातारा पोलीस दलाचा कॅन्टीनचा स्तुत्य उपक्रम  राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले.

पोलीस दलामार्फत येथील पोलीस करमणुक केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या पोलीस कॅन्टीचे नुतनीकरण करण्यात आले आहे याचे व नव्याने सुरु करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री दालनाचे उद्घाटन आज गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा पोलीस दलाने इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्रीचे दालन सुरु करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली असल्याचे सांगून यापुढे ज्या ज्या जिल्ह्यात जाईन त्या ठिकाणी पोलीस कॅन्टीनची माहिती घेऊन सातारा पोलीस दलाने सुरु केलल्या उपक्रमांची माहिती देऊन याच धर्तीवर कॅन्टींन चालविण्यासाठी सांगणार असल्याचेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.  सातारा पोलीस दलाचा हा उपक्रम आदर्शवत असून या उपक्रमाला त्यांनी शेवटी शुभेच्छाही दिल्या.
कमीत कमी दरामध्ये पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन वस्तु मिळाव्यात हा या पोलीस दलाच्या कॅन्टींनचा उद्देश आहे. 25  हजार ते 30 हजारापर्यंत सागरिका कॅन्टींनमधल्या वस्तुची विक्री होत होती आता या कॅन्टीनमधील वस्तुंची विक्री 1 लाख ते 1 लाख 500 हजारापर्यं दररोज  होत आहे. या कॅन्टींनमध्ये आणखीन वस्तु वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून हे कॅन्टींन माजी सैनिकांसाठी उपलब्ध असून माजी सैनिकांनी येताना ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या उद्घाटन कार्यक्रमात केले.
प्रारंभी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सागरिका पोलीस कॅन्टीनची पाहणी केली यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांनी कॅन्टीन माहिती दिली.
या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adv