दीपावलीला उत्साहात सुरुवात

40
Adv

दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी असून, त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी होणार आहे. मंगळवारी (ता.२१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य अवतरले आहे.

नरक चतुर्दशी हा हिंदू धर्मातील दिवाळीतील एक महत्त्वाचा सण समजला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला अमाप उत्साहात साजरा होतो. त्यानिमित्ताने सोमवारी पहाटे पहिले अभ्यंगस्नान होणार आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याची पौराणिक कथा आहे. या दिवशी नरकासुराच्या अत्याचारातून प्रजेला मुक्ती मिळवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याचा वध केला.

त्या प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. पहाटे उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करणे आणि कारीट फोडणे म्हणजेच कडवट फळ पायाने फोडणे अशी परंपरा आहे. ही परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जात आहे. यात कारीटला नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे कारीटवर पाय ठेवून ते फोडले जाते. ते फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते. हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते.

असे आहेत मुहूर्त

मंगळवारी लक्ष्मीपूजन असून, सायंकाळी सूर्यास्तानंतर सहा ते साडेआठ हा शुभमुहूर्त असल्याचे धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले. बुधवारी (ता. २२) दीपावली पाडवा सकाळी ६.२३ ते ७.५० (लाभ), सकाळी १०.४४ ते दुपारी १२.११ (शुभ), त्यानंतर दुपारी दुपारी चार ते सायंकाळी ६.५९ (शुभ) गुरुवारी भाऊबीज असून सकाळी ९.१३ ते दुपारी ३.२८ शुभ मुहूर्त आहे. रविवारी (ता. २६) पंचमी असून सकाळी ९.१७ ते १०.४४ (लाभ) तसेच १०.४४ ते दुपारी १२.१० अमृतयोग आहे, असे श्री. धारणे यांनी सांगितले.

Adv