सातारा: छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहे. अशा या आराध्य दैवता बद्दल बोलताना राज्यपालांनी वक्तव्य करताना केलेली चूक गंभीर आहे. साखर झोपेत असताना कोणीतरी बडबड करावी, इतक्या बेजबाबदारपणे वक्तव्य करून संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी साखर झोपेतून जागे होऊन शिवचरित्राचा अभ्यास करावा, असा सल्लाही आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी निषेध व्यक्त करताना दिला.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका जाहीर कार्यक्रमात अपुऱ्या व चुकीच्या माहितीच्या आधारे गुरु महिमा वर्णन केला. यावेळी गुरु श्रेष्ठ असतो हे सांगण्याच्या नादात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.
ज्या महाराष्ट्राची भूमी स्वराज्य उभारणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्याच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीने किमान शिवचरित्राचा अभ्यास करावा. इतकी माफक अपेक्षा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या शिवप्रेमी कडून होणे रास्त आहे. किंबहुना आपण ज्या संदर्भात जाहीर कार्यक्रमात वक्तव्य करत आहोत त्याबाबत माननीय न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट मत व्यक्त केले आहे. याबाबतही महाराष्ट्राचे राज्यपाल अनभिज्ञ आहेत, ही बाब मात्र कमालीची चीड निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य, लिखाण करणाऱ्या मंडळींना यापूर्वी शिवप्रेमींचा रोष काय असतो याची कल्पना आहे. त्यामुळे आपल्या वक्तव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्हे तर राज्यपाल पदाचाही आपण अपमान करत आहात. पहाटेच्या साखरझोपेतुन जागे व्हा, शिवचरित्राचा अभ्यास करा, योग्य ती माहिती घ्या आणि मगच शिवचरित्राच्या संदर्भात कोणतेही वक्तव्य करा. राज्यपाल भगतसिंग भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु बद्दल केलेल्या वक्तव्याने सध्या शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट आहे. राज्यपालांनी जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांना शिवप्रेमींच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सरदार सागर भोगावकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.