येथील शाहू स्टेडियम बॅडमिंटन कोर्ट दालनात उभारलेल्या करोना केअर सेंटरचे वीजबिल न भरल्याने महावितरणने स्टेडियमचा सोमवारी वीज पुरवठा खंडित केला .ही थकबाकी जवळपास नव्वद हजार रूपयांची असल्याचे वृत्त आहे .संपूर्ण स्टेडियमची वीज खंडित झाल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली .
दरम्यान या कारवाईला जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी स्वतःया कारवाईला दुजोरा दिला येथील जंबोहॉस्पिटल्सच्या जोडीने येथील शाहू स्टेडियम बॅडमिंटन संकुलामध्ये आठ महिन्यापूर्वी करोना केअर सेंटर उभारण्यात आले होते . जंबो च्या उपचार व्यवस्थेवर ताण पडू नये म्हणून ही समांतर सोय करण्यात आली होती . या करोना केअर सेंटरचे उद्घाटन स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते .करोनाची लाट अगदीच ओसरल्याने केअर सेंटर व जंबो हॉस्पिटल ची उपचार व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती .
आता या बंद करोना केअर सेंटरचे तब्बल नव्वद हजार रूपये वीजबिल मुदतीत भरले न गेल्याने महावितरणच्या वसुली विभागाने शाहू स्टेडियमचे वीज कनेक्शन सोमवारी कट केले . तब्बल तीन महिने अल्टिमेटम देऊनही बिल भरले न गेल्याने ही कारवाई करण्यात आली . संपूर्ण स्टेडियमचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सरावासाठी तेथे येणाऱ्या खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली . शासकीय कार्यालयात चालणारा सावळा गोंधळ या निमित्ताने समोर आला आहे . क्रीडा विभागाकडून या थकित वीज बिलासंदर्भात वारंवार पाठपुरावा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आला आहे . हा निधी उपलब्ध झाला असला तरी वीज कनेक्शन का कट करण्यात आले अशी विचारणा युवराज नाईक यांनी केली . जंबो हॉस्पिटल्स तब्बल तीस लाख रू वीजबिल थकविण्यात आले होते . प्रसार माध्यमांनी या विषयावर आवाज उठविल्यावर अठ्ठावीस लाख रुपये बिल दोन लाख रूपये प्रलंबित ठेवण्यात आले आहे . पालकमंत्री शाहू स्टेडियमच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली चालणारी सरकारी बाबूगिरी संताप आणणारी आहे .