सातारा : सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुोये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील.
सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत डिसेंबरमध्ये संपल्यानंतर पालिकेचे प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कार्यभार गेला. पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्यापूर्वी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शहरासह हद्दवाढीनंतर पालिकेत समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडी तसेच इतर त्रिशंकू भागातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठीचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधत निधीबाबत चर्चा केली. चर्चेअंती अजित पवार यांनी सातारा पालिकेच्या आराखड्यानुसार निधी देण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या.
शासनाकडे सादर केलेल्या ५१ कोटींच्या आराखड्यानुसार ४८ कोटी देण्याचा निर्णय शासनपातळीवर झाला. त्यापैकी २५ कोटींचा पहिला टप्पा पालिकेकडे जमा झाला. उर्वरित २३ कोटी मे महिन्याच्या अखेरीस जमा होणार आहेत. उपलब्ध निधीतून सर्वच भागातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी श्री.छ. उदयनराजेंनी उपलब्ध आणि येणाऱ्या निधीची शहराच्या चारही दिशांत विभागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार विलासपूर, गोळीबार मैदान परिसरासाठी १२ कोटींचा निधी टप्प्याटप्पाने वितरित केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात विकासपूर व गोळीबार मैदान परिसरात विकासकामांचा झंझावात नागरिकांना पाहावयास मिळेल.