सहकारी संस्थांची चौथ्या ते सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया 1 एप्रिलपासून

281
Adv

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यातील तसेच 2021 मधील 31 मार्च 2021 पर्यंत मुदत संपलेल्या एकूण 17 हजार 194 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस 1 एप्रिल 2022 पासून सुरुवात होणार आहे.

शासनाने कोव्हिड- 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया वेळोवेळी आदेश पारीत करून पुढे ढकललेल्या होत्या. परंतु, सद्यस्थितीत निवडणूक स्थगित करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट 2021 रोजी समाप्त झालेला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिनांक 31 डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र 45 हजार 409 सहकारी संस्थांचा 6 टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला  आहे. तसेच ई-1 सन 2021 व ई-1 सन 2022 मध्ये अनुक्रमे 19 हजार 755 आणि 13 हजार 32 सहकारी संस्था निवडणूकीस पात्र आहेत.

प्राधिकरणाने ‘जिल्हा निवडणूक आराखडयातील’ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 3 हजार 905 व 13 हजार 98 अशा एकूण 17 हजार 3 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केलेल्या आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यातील इतर 9 हजार 99 व उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार 31 मार्च 2022 पर्यंत निवडणूकीस पात्र  15 हजार 320 प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था अशा एकूण 24 हजार 419 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केलेल्या असून अशा एकूण 41 हजार 422 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या आहेत.

Adv