
करोना संक्रमणाचा संसर्ग शहरात वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागात मुख्याधिकारी विरुद्ध आरोग्य निरीक्षक असे शीतयुद्ध किरकोळ कारणावरून सुरु झाले आहे . पाणीपुरवठा विभागाचे शहाजी वाठारे यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज देण्यात आला तरी त्यांनी तो स्वीकारलेला नाही .
आरोग्य विभागाचा कारभारी म्हणून प्रकाश राठोड यांच्यावर जवाबदारी देण्यात आलेली असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट व प्रकाश राठोड यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत . एका प्रकरणामध्ये वार्षिक दरापेक्षा जास्त दराचे इस्टिमेट बनविल्याने राठोड यांना चांगलेच बोल ऐकून घ्यावे लागले होते . या लुटपुटीच्या वादाचा वसुली विभागाच्या बैठकी दरम्यान जोरदार भडका उडाला . काही कारणावरून मुख्याधिकाऱ्यांनी तिन्ही आरोग्य निरीक्षक काहीच कामाचे नाही अशी शेलकी कमेंट केल्याने राठोड रागाने उसळले आणि उभयतांमध्ये जोरदार वादावादी झाली . अगदी डीएमए ऑफिसपर्यंत एकमेकांचे अहवाल पाठविण्याचे वाद प्रतिवाद झाले . या प्रकरणाचा प्रत्यक्ष परिणाम लगेच दिसून आला . मुख्याधिका ऱ्यांनी तत्काळ आरोग्य विभागाचा चार्ज पाणी पुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्याकडे सोपवला . आता वाठारे पाणीपुरवठा विभागात हजर होऊन काहीच महिने झाले आहेत . अचानक आरोग्य विभागाची दुहेरी जवाबदारी आल्याने त्यांनी सुद्धा हे प्रकरण अधांतरीच ठेवले आहे . येत्या सोमवार पासून मुख्याधिका ऱ्यांशी चर्चा करून या विभागाचा चार्ज घेण्याचा निर्णय घेऊ असे वाठारे यांनी सांगितले .
घंटा गाडीच्या बहुचर्चित आगामी निविदांच्या निमित्ताने खुस्पट काढून आरोग्य विभागाचा कारभारी बदलला जाणार असल्याचे हवाले आरोग्य विभागातीलच काही कर्मचार्यांनी दिले आहेत . या टेंडरची तांत्रिक मान्यता झाली असून ही फाईल अंतिम प्रशासकीय मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे . शहराची हद्दवाढ झाल्यानंतर जादा घंटागाडी आणि स्वच्छता कामगार यांची गरज पडणारच आहे . यांच्या समन्वयासाठी मॅनेजमेंट जाणणारा अधिकारी या खुर्चीत असावा आणि तो मर्जीतला असावा यासाठी हे शीतयुद्ध रंगविले जात असल्याची चर्चा आहे . अगदी गरज पडल्यास मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा पिंपरी चिंचवडला बदलून पाठविण्यासाठी मंत्रालयात फिल्डिंग लावून काही जणांनी बाह्या सरसावल्याचे वृत्त आहे . करोना चा कहर वाढत असताना शहरात आरोग्य आणीबाणी होऊ नये यासाठी प्रशासन सातत्याने झटत असून वेळप्रसंगी शहरात तीन ठिकाणी करोना केअर सेंटर उभारण्याची तयारी झाली आहे . परदेशातून शहरात येणाऱ्यांचे गृहविलगीकरण आणि त्यांची तपासणी या आराखड्यांच्या अंमलबजावणी पेक्षा आरोग्य विभाग मात्र वादावादीचा आखाडा झाल्याने सातारकरां च्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत .







