पालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन लवकर उदयनराजे यांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

866
Adv

सातारा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम आराखड्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून भरीव निधी प्राप्त करुन घेवून, लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची सुरुवात केली जाईल. राजधानी सातारा शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेवून बांधकामामध्ये ऐतिहासिक झालर असलेली, महाराष्ट्रातच नव्हे तर देशातसुध्दा कोणत्याही नगरपरिषदेची अशी इमारत कुठेही नसेल इतकी वैभवशाली आठ मजली प्रशासकीय इमारत सातारा शहराचा मानबिंदू ठरणारी असेल. या अद्यावत वास्तुमधुन राजकारण विरहीत केवळ सकारात्मक लोककल्याणकारी कार्य आणि सातारकर नागरिकांचे हित अखंडपणे पाहिले जाईल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सातारा शहराची वाढती लोकसंख्या तसेच होवू घातलेली व आज झालेली हद्दवाढ, भविष्यातील नगरपरिषदेची होणारी महानगरपालिका इत्यादींचा विचार करुन नगरपरिषदेला अद्यावत प्रशासकीय इमारत आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनाला लोकसेवा देताना समस्या येतील या बाबी लक्षात घेवून अत्याधुनिक सुविधांसह सुसज्य, कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवणारी व्यवस्था असलेल्या प्रशासकीय इमारतीची संकल्पना सातारा विकास आघाडीने राबविण्याचे ठरवले.

बाबासाहेब कल्याणी यांचे औदार्य

पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी त्यांची मध्यवस्तीमधील आज कोट्यवधी रूपयांची किंमत असलेली सुमारे एक एकर जागा नगरपरिषदेला देण्याचे मोठ्या मनाने मान्य केले. त्यांच्या औदार्याबाबत पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांचे जितके आभार मानावेत तितके ते कमी आहेत. ही जागा कोणत्याही पध्दतीने हस्तातरीत म्हणजेच बक्षीसपत्र, दानपत्र इत्यादी पध्दतीने केले असते तर नगरपरिषदेला सुमारे २६ लाख इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती. तथापि या जागेचे कन्सिडर हस्तांतरमूल्य एक रुपया दाखवून, सुमारे २६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीसुध्दा रितसर वाचवण्यात आली. सुमारे ४० गुंठ्याची कोट्यवधीची मालमत्ता फक्त १ रुपया नाममात्र मुल्याने खरेदीखताने नगरपरिषदेच्या मालकीची झाली. असे उदाहरण पहिलेच असावे.

सुमारे ६० कोटी खर्चाचा अंदाज

आराखड्यानुसार इमारतीसाठी सुमारे ६० कोटीहून अधिक निधी लागण्याचा अंदाज आहे. या आवश्यक खर्चाच्या निधीकरिता राज्य शासनाच्या वैशिष्टयपूर्ण / नाविन्यपूर्ण विकास कामे या योजनेखाली निधी प्राप्त करुन घेतला जाणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारीतून विशेष बाब म्हणून भरीव निधी प्राप्त करुन घेतला जाणार आहे. त्याकरिता लवकरच संबंधित मंत्रीमहोदयांना भेटणार आहे असून लवकरच या महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

Adv