
राज्य शासनाकडून जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांना निधी मिळाला आहे. तो वेळेत खर्च करावा. मैदान नसणार्या तालुक्यांनी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सहकारमंत्री व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या. दरम्यान, श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी फुटबॉल मैदानासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.
सातारा जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, सहायक अभियंता राहूल अहिरे, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार मनोज कान्हेरे आदि उपस्थित होते.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलामधील 400 मीटर धावणे मार्ग, इनडोअर हॉल, बास्केटबॉल कोर्ट, लॉन-टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान, वसतिगृह, क्लब हाऊस इत्यादी सुविधा उभारण्यात आलेल्या असून त्या नागरिक व खेळाडूंकरिता खुल्या करण्यात आलेल्या आहेत. जलतरण तलाव, बास्केटबॉल, लॉन टेनिस दुरुस्तीकरिता मान्यता प्रदान करुन अद्ययावत सुविधा खेळाडूंकरिता लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच संकुलातील विविध सुविधा व स्वच्छतेकरिता विद्युत उपकरणे खरेदीसाठी मान्यता दिल्यामुळे स्वच्छता राखणे सोयीचे होणार आहे. जलतरण खेळासंबंधातील अद्ययावत क्रीडा साहित्य लवकरच खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सुशोभिकरण व फर्निचर करण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिल्यामुळे सुसज्ज असे कार्यालय व बैठक व्यवस्था निर्माण होणार आहे. तसेच या बैठकीमध्ये जलतरण तलाव दुरुस्ती व आवश्यक साहित्य खरेदी, स्वच्छतेकरिता विद्युत उपकरणे खरेदी, बास्केट बॉल, व लॉन-टेनिस मैदान दुरुस्ती व व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, संकुलातील सुविधांचे आरक्षण शुल्क निश्चित करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
चौकट
श्री. छ. वृषालीराजे यांच्या प्रयत्नामुळे निधी
श्रीमंत छत्रपती वृषालीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे निधी उपलब्ध बॅडमिंटन कोर्टची दुरुस्ती झाली. फुटबॉल मैदानासाठी निधी मिळावा, अशी विनंती मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा संघटनांच्या कार्यालयांचा कर कमी करावा व नियमित करात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत ना. बाळासाहेब पाटील यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली. यासंदर्भात दि. 13 रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी, मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे.







