सातारा, दि. – सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असणा-या जनता सहकारी बँक लि. साताराचे प्रशासन अधिकारी, व्यवस्थापक मच्छिंद्र हणमंत जगदाळे हे बँकेची प्रदीर्घ अशी 31 वर्षे सेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम राधिका रोड येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे झाला. यावेळी बँकेच्यावतीने मानचिन्ह प्रदान करुन त्यांचा सपत्नीक सत्कार बँकेचे संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील कुमठे या लहानश्या खेडयातून व शेतकरी कुटुंबातून 1990 च्या दरम्यान सातारा शहरामध्ये येऊन श्री.जगदाळे ऑक्टोंबर 1990 पासून बँकेच्या सेवेत लेखनिक या पदावर रुजू झाले. ज्युनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर, शाखाधिकारी, उपव्यवस्थापक अशा विविध पदांवर उत्तम व शिस्तबध्द कामकाज करुन ते आज व्यवस्थापक, प्रशासन विभाग या महत्वाच्या पदावरुन सेवानिवृत्त झाले. प्रशासकीय कामकाजातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे बँकेतील सेवकांना योग्य ती दिशा देण्यात आणि शिस्त लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करुन बँकेच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच वयाच्या अटीमुळे श्री.जगदाळे हे सेवानिवृत्त होत असले तरी ते कायम जनता बँकेच्या पाठीशी राहतील याची खात्री आहे. त्यांच्या गौरवपूर्ण सहकार्याची जाणीव आम्हाला कायम राहील असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना श्री.जगदाळे यांनी बँकेतील सर्व आजी, माजी पदाधिकारी, सेवक तसेच बँकेशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्यामुळेच बँकेची 31 वर्षे एवढी प्रदीर्घ सेवा करता आली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी सातारा जिल्हयातील प्रथितयश कायदेतज्ञ अॅड. गोकुळ सारडा यांची सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा बँकेचे ज्येष्ठ संचालक जयवंतदादा भोसले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, माधव सारडा, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके (सराफ), अविनाश बाचल, प्रा.अरुण यादव, निशांत पाटील, रविंद्र माने, विजय बडेकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर, केतन जगदाळे, ओंकार पोतदार, तज्ञ संचालक धीरज कासट, निमंत्रित संचालक अजित साळुंखे, सेवक संचालक उमेश साठे, सुरेंद्र वारद, प्रशासन अधिकारी अनिल जठार, बँकेतील आजी व माजी सेवक वर्ग, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. रामचंद्र मुंढेकर (बाबा), कोरेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, डॉ. श्रीराम भाकरे, माजी नगरसेवक रविंद्र झुटींग आणि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शास्त्री यांनी केले.
चौकट
सेवानिवृत्तीदिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्द
भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने भारत सरकारच्या प्रयास-सेवानिवृत्ती की तिथीपर पेन्शन जारी करने का प्रयास या योजनेतंर्गत जनता सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र जगदाळे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच कोल्हापूर येथील क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त बीरेंद्र कुमार यांच्याहस्ते पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपुर्त करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा विशेष उपक्रम भारत सरकारच्या नव्या प्रयास योजनेमुळेच करणे शक्य झाले आहे असे उद्गार काढले. यापुढील काळात बँकेतील जास्तीत जास्त कर्मचा-यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी त्यांची योग्य ती माहिती आमच्या कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास आम्ही स्वतः आपल्या बँकेच्या मुख्य कार्यालयात येऊन कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्त करु यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले. याप्रसंगी सहाय्यक क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित चौगुले, लेखाधिकारी श्रीकांत बरगे, सहा. देखभालकर्ता सचिन सवाखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.







