सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या शाहूनगर, विलासपूर, खेडचा काही भाग आणि शाहुपूरी या नवीन भागातील करावयाच्या एकूण 48 कोटी रुपयांच्या सुमारे 550 कामांची निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात येवून, या सर्व कामांचे कार्यादेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत.
या कामांची प्रत्यक्ष सुरुवात आता होत आहे. सातारा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या भागातील विविध लोकोपयोगी आणि अत्यावश्यक कामांचा 48 कोटी रुपयांचा प्रस्ताव सन 2020 च्या सुरुवातीस सातारा विकास आघाडीने तयार करुन, निधी मिळण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठविला होता.
या प्रस्तावास मंजूरी मिळण्यासाठी आम्ही स्वत: जरुर तो पत्रव्यवहार करुन, तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विदयमान मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे तत्कालीन विरोधी पक्ष नेते व विद्यमान उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार यांची समक्ष भेट घेवून आग्रही मागणी केली
होती.
प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यावर, प्रशासक राजवटीमध्ये या सर्व कामांची निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आणि आज मुख्याधिकारी यांनी या सर्व कामांचे संबंधीतांना कार्यादेश अर्थात वर्कऑर्डर दिली आहे. या 48 कोटींच्या कामाचा प्रस्ताव करताना शाहूनगर, शाहुपूरी, खेडचा राष्ट्रीय महामार्गाच्या
पश्चिमेकडील काही भाग, महादरे आणि विलासपूर ग्रामपंचायतीचा भाग या भागाचे नगरअभियंता यांनी सर्वेक्षण केले होते.
सर्वेक्षणात तसेच स्थानिकांच्या मागणीप्रमाणे आवश्यकता आणि गरज ओळखुन, 48 कोटी रुपयांचा प्रस्ताव सातारा विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त करण्यात आला होता. हद्दवाढ भागातील तत्कालीन ग्रामपंचायतींचा आवाका, वाढते सोसायटयांचे नागरीकरण, अत्यावश्यक बाबी याचा संपूर्ण विचार करुन, केवळ आणि केवळ सार्वजनिक लोकहित लक्षात घेवून हा प्रस्ताव करण्यात आला. यामध्ये कोणत्याही गटा-तटाचा विचार न करता, अतिआवश्यक कामे साविआने सुचविलेली होती.
याकामांमध्ये हद्दवाढ भागातील 41.20 किलोमिटरचे, एकूण 411 अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे यामध्ये भाग्योदय कॉलनी, तामजाईनगर, गणेश कॉलनी, कुंभारवाडा, महादरे, पिरवाडी, गोळीबार मैदान, रामराव पवार नगर, गोडाली, विलासपूर, शाहूनगर, आदर्श कॉलनी, लक्ष्मीनारायण नगर, गणेश कॉलनी, भैरोबा पायथा, शाहुपूरी, खेड, येथील कामांचा समावेश आहे. तसेच रामराव पवार नगर, समाधीचा माळ, शाहुपूरी, शाहूनगर येथील सुमारे 13 किलोमिटर लांबीची पावसाळी गटर्स, यांचा समावेश आहे. हद्दवाढ भागात एकूण 704 पथदिवे, हद्दवाढ भागातील रामराव पवार नगर, वाढेफाटा, रांगोळे कॉलनी, शिवराज कॉलनी या चार उद्यानांचा विकास इत्यादी कामांचे कार्यादेश दिले आहेत.
या कामांकरीता निधी मिळण्यासाठी जोरदार पाठपुरावा करावा लागला, निधी लवकर मिळु नये म्हणूनही काही अदृष्य शक्ती प्रयत्न करीत होत्या. परंतु त्या सर्वावर मात करीत 48 कोटींचा निधी प्राप्त करुन घेतला. दरम्यानच्या काळात निधी मिळण्याची वाट न बघता सर्वोच्य गरजेची काही कामे नगरपरिषदेच्या निधीतुन तातडीने करण्यात आली. आता सुमारे 550 कामांचे कार्यादेश दिले असल्याने, कामे सुरु करण्यातील सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. आता या भागात गतीने आणि मोठया प्रमाणात विकास कामे सुरु होतील.
हद्दवाढ भागातील नागरीकांना सुविधा पुरवणे या एकमेव उद्देशाने ही कामे आता सुरु होत असल्याने, याचे विशेष समाधान आहे.हद्दवाढ भागातील नागरीकांना सुविधा पुरवणे या एकमेव उद्देशाने ही कामे आता सुरु होत असल्याने, याचे विशेष समाधान आहे. या संपूर्ण प्रक्रीयेत हद्दवाढ भागातील स्थानिक नागरीक यांनी केलेले सहकार्य आणि मुख्यधिकारी श्री. अभिजीत बापट, मुख्य नगरअभियंता श्री. दिलीप चिद्रे यांचेसह सर्व सहाय्यक उपअभियंते, तसेच नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने घेतलेले श्रम आज कामी आले आहेत.







