सातारा नगर परिषदेमार्फत सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार्या डॉ. नरेंद दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तींची नावे निवड समितीकडून अंतिम करण्यात येत आहेत. पंधरा दिवसांत हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल अशी ग्वाही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य केले आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचे चिरंतन स्मरण व्हावे, या उदात्त हेतूने सातारा नगर परिषदेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केले जाते. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अनिल काकोडकर या महनीय विभुतींना दिला आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे या पुरस्काराचे वितरण होवू शकले नव्हते. या पुरस्काराचे वितरण करावे, अशीही मागणी होत होती. मात्र कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांवर असलेले निर्बंध यामुळे पुरस्कार वितरणास विलंब झाला. या पुरस्कार वितरणाचा विसर पडला नसून त्यानुषंगाने पुरस्कार प्राप्त व्यक्तींची समितीकडून निवड प्रक्रिया सुरु होती.
सन 2018-19, 2019-20 आणि 2020-21 या वर्षांतील पुरस्कारांचे वितरण एकाचवेळी करण्यात येणार आहे. सामाजिक जाणीवेतून दिलेले योगदान, समाजाप्रती तळमळ असलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींनी केलेले सामाजिक कार्य, समाजाप्रती जपलेली बांधिलकी, लोकहिताची केलेली कामे आदिंची दखल निवड समितीकडून घेण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर लगेचच पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तयारीही केली जाणार आहे. पंधरा दिवसांत डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचेही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्पष्ट केले आहे.