दरवर्षी श्रमदानातून प्रत्येक किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार

258
Adv

सातारा, दि. – स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा, लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे शिवस्वराज्यभिषेक दिन. प्रत्येकाला गुलामगिरीच्याविरोधात लढा देण्यासाठी प्रेरणा देणारा हा दिवस. श्री.छ. शिवाजी महाराजांनी 350 हून अधिक गडकोट, किल्ले बांधले. त्यांच्या या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दरवर्षी प्रत्येक किल्ल्यावर श्रमदान करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा निर्धार शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी केला.
महाराष्ट्रातील एकमेव जोडकिल्ला चंदन-वंदन किल्ल्यावर शाहुनगरी फाऊंडेशनच्यावतीने श्रमदान करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शाहुनगरी फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करुन समस्त प्रजेला स्वातंत्र्याची प्रेरणा देऊन श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. असंख्य मावळयांचे बलिदान दिल्यानंतर हे स्वराज्य उभे राहिले आणि आजच्या दिवशी त्याला सार्वभौमत्व प्राप्त झाले. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. श्री.छ.शिवाजी महाराजांचे विचार, कार्य नवीन पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी शाहुनगरी फाऊंडेशची स्थापना झाली असून त्याला कृतीची जोड म्हणून आजचा शिवराज्याभिषेक दिन श्रमदान करुन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील एकमेव जोडकिल्ला म्हणजेच हा चंदन- वंदन किल्ला होय. चंदन या किल्ल्यापेक्षा वंदन किल्ला थोडा उंच आहे. वंदन गड किल्ला पाच टप्प्यात विभागला आहे तर चंदनगड हा तीन टप्प्यात आहे. आणि आच किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले आहे. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी या गावात मोडतो तर वंदनगड हा वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये मोडते. चंदन- वंदन किल्ल्याची उंची हे सुमारे 3800 फूट एवढी आहे. व हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो. तरी ह्या किल्ल्याची चढाई ही सोपी आहे. व किल्ल्याची सध्याची स्थिती बर्‍यापैकी व्यवस्थित आहे. महाराष्ट्रातील पहिला जोडकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा चंदन वंदन किल्ला इतिहासामध्ये महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे या किल्ल्याची निवड करण्यात आली. येथून पुढे प्रत्येकवर्षी शिवराज्याभिषेक दिन प्रत्येक किल्ल्यावर श्रमदान करुन साजरा करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी शंभू महादेवाचे दर्शन घेऊन तुळाजी आंग्रे, दादोजी वाघ यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी त्यांनी श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान किल्ले वंदनगड यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. या ठिकाणी 250 वर्षानंतर प्रथमच राजघराण्यातील व्यक्तींनी या किल्ल्याला भेट दिल्याचे याप्रसंगी उपस्थितांनी सांगितले. या श्रमदानासाठी श्रीमंत रविराज बाबा, शाहुनगरी फाऊंडेशनचे सचिव सुशांत मोरे, निलेश झोरे, विक्रम क्षीरसागर, शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश बाबर, अभी सुर्वे, विपुल चव्हाण, सोहम जगताप, कुलदीप नलगे, सोहम कदम, शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Adv