15 मे पर्यंत कासचे काम पूर्ण होणार – छ,उदयनराजे कास ग्रामस्थांच्या समस्यांचा जाग्यावरच निपटारा

547
Adv

कास धरणाचे काम बंद पाडणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्यांचा खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी जाग्यावरच निपटारा केला . गावठाणासह इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आल्याचे उदयनराजे यांनी सांगताच ग्रामस्थांचा विरोध मावळला . सड्यावरून गावात येणाऱ्या रस्त्यासाठी पुन्हा वनविभागाबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन दिले , तर कास धरण कृती समिती अस्तित्वात आणण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली .

दरम्यान कास धरणाचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .

रविवारी सकाळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कास धरण विस्तारीकरणाच्या कामाला भेट दिली . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे,यावेळी अॅड दत्ता बनकर, बांधकाम सभापती सिध्दी पवार, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, पाणी पुरवठा सभापती , जलसंपदा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते .. या पाहणी दौऱ्या दरम्यान दोन दिवसा पूर्वी धरणाच्या भिंतीवर आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी उदयनराजे यांची भेट घेतली . कास गावठाणासह, स्मशानभूमी मंदिर इतर पायाभूत सुविधा, गावालगत पठारावरून जाण्यासाठी नवा रस्ता, कास धरण कृती समिती इं प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांनी उदयनराजे यांच्याशी चर्चा करून या सुविधांची मागणी केली . पायाभूत सुविधांच्या सर्व मागण्या मान्य करून कास धरण समितीची मागणी त्यांनी फेटाळली . सडयावरून येणाऱ्या रस्त्यासाठी वन विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले . सर्व समस्यांचे निराकरण केल्याने ग्रामस्थांनी उदयनराजे यांना धन्यवाद दिले .

६० कोटी रूपयांवर बजेट पोहचलेल्या कास धरणाचे इंटेक वेल सह ऐंशी टक्के काम झाले आहे . या धरणात अर्धा टीएमसी पाणीसाठा होणार आहे . सध्या सांडव्यांच्या भिंतीच्या मजबूती करणाचे काम प्रगतीपथावर आहे . या कामासाठी कास पठारावरून तलावाकडे येणारा रस्ता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात येणार असून बामणोलीकडे जाणारी वाहने एकीव कडून जातील असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले . या कामाची सर्व माहिती उदयनराजे यांनी घेतली व कास धरणाचे सर्व काम १५ मे पर्यंत पूर्ण होतील असे पत्रकारांशी बोलताना सांगितले . कास धरण उंचीमुळे हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे . सातारा विकास आघाडीने आपला वचननामा पूर्ण केला आहे . धरण आणि पुनर्वसन ही दोन्ही कामे समांतरपणे सुरू राहणार आहेत . कास परिसर येत्या काही वर्षात युनेस्कोच्या निकषाप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल अशी ग्वाही उदयनराजे भोसले यांनी दिली .

चौकट-
उदयनराजे यांच्या कास धरण पाहणी दौऱ्यात नगराध्यक्ष माधवी कदम यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणविली .नगराध्यक्ष एका पुरस्कार कार्यक्रमासाठी शनिवारी महाबळेश्वरमध्ये होत्या मात्र रविवारी प्रत्यक्ष कास पाहणी दौऱ्यात त्या दिसल्या नाहीत . या दौऱ्याला सर्व महिला सभापती उपस्थित होत्या मात्र प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असताना नगराध्यक्षांची अनुपस्थिती मात्र सर्वांनाच खटकली .

चौकट-
या पाहणी दौऱ्यात उदयनराजे यांनी माजगावकर माळ येथे पंतप्रधान घरकुल योजनेच्या जागेची पाहणी केली . येथे दोन हजार घरे गरजू लोकांसाठी बांधली जाणार असून ही दोनशे कोटीची योजना आहे . वीस वर्षापूर्वी कचरा कुंडी व झोपडपट्टीमुक्त शहर अशी घोषणा आम्ही केली होती . शहर कचरा कुंडी मुक्त झाले आहे . आणि सातारा झोपडपट्टी मुक्त होत आहे याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली .

Adv