Saturday, October 17, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा जिल्ह्यात १७ व १८ रोजी प्रचाराचा झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा जिल्ह्यात १७ व १८ रोजी प्रचाराचा झंझावात

94
Adv

सातारा प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा शनिवार आणि रविवार, दि. १७ व १८ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यात प्रचारदौरा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसांत सातारा, रहिमतपूर, कराड आणि पाटण येथे मेळावे घेण्यात येणार असून, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींसह शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या दौऱ्यात जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि विविध आघाड्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ येथे मेळावा होणार आहे. यावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, चित्रलेखा माने-कदम, निलेश माने आणि तेजस्विनी घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर कोडोली येथील जानाई-मळाई शिक्षण संस्थेला भेट देऊन आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि राजू माने यांची त्या भेट घेणार आहेत. रहिमतपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील माने यांचीही त्या भेट घेणार आहेत.

सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची, तर सुरुचि निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार मनोज घोरपडे यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक, जनता बँकेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात येणार आहे. सावकार कॉलेज आणि यशोदा शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांशीही त्या संवाद साधणार आहेत.

दुपारी २ वाजता कराड दक्षिणमधील ढेबेवाडी रस्त्यावरील ओम हॉल येथे, तर दुपारी ३ वाजता कृष्णा हॉस्पिटल परिसरातील बॅडमिंटन हॉल येथे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता पाटण तालुक्यातील काळोली येथील ऋचा मंगल कार्यालयात मेळावा होणार आहे.

रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम यांच्या निवासस्थानी डॉ. जाधव भेट देणार आहेत. सकाळी ९.३० ते ११ या वेळेत त्या सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सातारा जिल्हास्तरीय मेळावा होणार आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यातून महायुतीच्या नेत्यांशी समन्वय साधण्याबरोबरच पदवीधर मतदार, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव यांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Adv