Sunday, October 18, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँक निवडणुकीत माघारीचे सत्र सुरू

जिल्हा बँक निवडणुकीत माघारीचे सत्र सुरू

83
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सातारा विकास सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवार बाबासाहेब शिवाजी कदम यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. त्यामुळे निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी आता १९ आणि २१ ऑक्टोबर २०२६ हे दोन दिवस उपलब्ध आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नामनिर्देशन पत्र केवळ संबंधित उमेदवार किंवा त्यांच्याकडून लेखी प्राधिकृत करण्यात आलेला सूचक यांनाच मागे घेता येणार आहे. यासाठी संबंधितांनी आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखे फोटो ओळखपत्र सोबत घेऊन निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच विहित नमुन्यातील नोटीस दाखल करावी लागणार आहे.
निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये, यासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना किंवा त्यांच्या लेखी प्राधिकृत सूचकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आता १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या माघारीच्या प्रक्रियेत कोणते उमेदवार माघार घेतात आणि निवडणुकीचे अंतिम चित्र कसे स्पष्ट होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Adv