Saturday, September 12, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात; रामराजेंच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात; रामराजेंच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

84
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, आता २१ जागांवर कोणाला संधी द्यायची आणि कोणाला ‘सेफ एन्ट्री’ द्यायची, यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका आणि चर्चांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक प्रत्यक्ष मतदानापेक्षा चर्चा, तडजोडी आणि राजकीय मांडणीतूनच रंगणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

अंतिम यादीत सुमारे २,०१९ पात्र मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत घट झाल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः सोसायटी मतदारसंघातील ठरावांवर कोणतेही तांत्रिक आक्षेप राहणार नाहीत, याची खबरदारी इच्छुकांकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदारसंघनिहाय ‘जमवाजमव’ सुरू झाल्याचे चित्र आहे.

दिग्गजांच्या पुनरागमनाची चर्चा

जिल्हा बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सत्ता असली तरी संचालक मंडळातील राजकीय ताकदीचा विचार करता भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वजन निर्णायक मानले जाते. त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील अन्य प्रमुख नेत्यांचे समर्थकही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
विद्यमान संचालकांपैकी कोणाला पुन्हा संधी द्यायची, कोणत्या मतदारसंघात कोणाला मोकळीक द्यायची आणि कोणत्या जागेवर नव्या चेहऱ्याला संधी द्यायची, यावरच महायुतीतील जागावाटपाचे गणित अवलंबून राहणार आहे.

‘डिप्लोमसी’ची रंगीत तालीम

शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर आणि अन्य संचालकांमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. अधिकृतपणे बँकेच्या कामकाजाशी संबंधित विषय चर्चेत असल्याचे सांगितले जात असले, तरी आगामी निवडणूक हा चर्चेचा मुख्य विषय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
येत्या दोन दिवसांत महायुतीतील प्रमुख घटक पुन्हा एकत्र बसून जिल्हा पातळीवर राजकीय ‘डिप्लोमसी’ची रंगीत तालीम करण्याची शक्यता आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील, नितीन काका पाटील, उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्या भूमिकेला या चर्चेत विशेष महत्त्व राहणार आहे.

मतदानापूर्वीच निकालाची दिशा?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारंपरिक पक्षीय राजकारणापेक्षा सहकारातील स्थानिक गटबाजी, सोसायट्यांचे ठराव आणि नेत्यांची परस्पर राजकीय समीकरणे अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे कोण किती जागा लढवणार यापेक्षा कोणाला कोणाच्या कोट्यातून प्रवेश मिळणार, याचीच उत्सुकता अधिक आहे.
अंतिम मतदार यादीने निवडणुकीचा मार्ग मोकळा केला असला तरी खरी निवडणूक आता बैठकींच्या बंद दाराआड सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची सत्ता मतदानपेटीत ठरण्याआधीच चर्चेच्या टेबलावर तिची दिशा निश्चित होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Adv