सातारा : जागतिक वारसा लाभलेल्या कास पठार हंगाम २०२६चा शुभारंभ वन विभाग, सातारा वन परिक्षेत्र सातारा–मेढा आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने उत्साहात करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
पावसाळ्यानंतर विविध रंगांच्या फुलांनी बहरणारे कास पठार हे सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाची ओळख बनले आहे. कासच्या अद्वितीय नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होतात. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार, व्यवसाय आणि उत्पन्नाच्या विविध संधी उपलब्ध होत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते.
कास पठाराची जैवविविधता अत्यंत नाजूक असून, त्याचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यटकांनी कास पठारावर येताना वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्लास्टिक, कचरा किंवा अन्य प्रकारामुळे या निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कासचा निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिकांचा वारसा जपत पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाला प्राधान्य देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधला तर कास पठाराचा हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांसाठीही सुरक्षित ठेवता येईल.
यावेळी भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home Latest News Politics|Satara District कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ; फुलांच्या रंगोत्सवासाठी कास सज्ज!






