सातारा जिल्ह्यात आयटी हबसाठी प्रमाणित पद्धत निश्चित करावी

401
Adv

महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार महाराष्ट्रातील आयटी प्रकल्पांची स्थापना / संचलन महानगरांशिवाय त्रिस्तरीय म्हणजेच लहान,मध्यम आणि मोठया शहरामधुन करण्यात यावी, पुणे मेट्रोसिटीचे जवळ व मध्यम शहर असलेल्या साता-यात अश्या आयटी कंपन्यांच्या कार्यक्षमतेला वाव आहे. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे सुविधां, मुबलक जागा आणि पायाभुत सुविधा, चांगले हवामान यासारख्या अनेक सकारात्मक बाबी उपलब्घ आहेत. महानगरांवरील असणारा ताण थोडयाफार प्रमाणात कमी होण्यासाठी त्रिस्तरीय शहरांमध्ये आयटी प्रकल्प राबविण्याबाबत राज्यसरकारशी समन्वय साधुन एसओपी (स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) निश्चित करावी अशी मागणी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.अश्विनी वैष्णव यांना लोकहितासाठी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, आयटी प्रकल्पांचे संचलन राज्यातील त्रिस्तरीय शहरामधुन करण्याबाबत धोरण आहे आणि ते निश्चितच स्वागतार्ह आहे. या धोरणामुळे मेट्रो सिटींवर पडणारा ताण कमी होण्याबरोबरच त्रिस्तरीय शहरामधील युवकांना स्थलांतर कमी होवून, त्यांना आपल्या शहरातच रोजगार उपलब्ध होणे आणि त्या योगे, शहरांचा अप्रत्यक्षपणे स्थानिक आर्थिक विकास होणार आहे. त्रिस्तरीय शहरामध्ये पुरेशी मुबलक जागा उपलब्ध होणे सहज शक्य आहे. आयटी प्रकल्प राबविणे मेट्रोसिटीपेक्षा कमी खर्चीक असणार आहे. मेट्रोसिटीं मध्ये होणारी दगदग-धावपळ देखिल काही प्रमाणात कमी होणार आहे. तसेच संतुलित पर्यावरण पुरक स्थानिक विकास साध्य होणार आहे. आयटी क्षेत्रातील नोकरदारांचा दैनंदिन निर्वाह महानगरांतील खर्चापेक्षा कमी खर्चात होणार आहे.

केंद्रशासनाने, राज्यशासनाशी सल्लामसलत करुन, शासन धोरण ठरवून, ज्या कंपन्यांना शासकीय निधी /शासनसंबंधीत सहकार्य देतेवेळी अश्या आयटी प्रकल्पांची स्थापना त्रिस्तरीय शहरामध्ये करण्याबाबत अटी शर्ती घातल्यास, महानगरांवरुन त्रिस्तरीय शहरांकडे आयटी प्रकल्प सहज राबविले जातील अशी आमची धारणा आहे. आयटी प्रकल्प स्थापन करण्यासाठी पब्लीक-प्रायव्हेट पार्टनरशिप व्दारे शासनाच्या उपक्रमाव्दारे खाजगी आयटी कंपन्या देखिल सातारा मध्येस्थापन करता येणार आहेत.
आमच्या सातारा लोकसभा मतदार संघातील सातारा हे मध्यम शहर, हे पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. येथे चांगली रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. पुणे विमानतळ देखिल सातारा पासून फार दुर नाही. याठिकाणी आयटी कंपन्यांसाठी पायाभुत सुविधा मुबलक आहेत. या आणि अश्या कारणासाठी आम्ही राज्यशासनाकडे आणि आयटी कंपन्यांच्या भागधारकांकडे सातारा येथे आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्रिस्तरीय शहरामध्ये आयटी कंपन्या कार्यरत झाल्यास, आयटी बरोबरच कृत्रिम बुध्दीमत्ता, सेमी कंडक्टर सारख्या क्षेत्राला सुध्दा वाव मिळणार आहे आदी बाबी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनात नमुद केल्या आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मांडलेली वस्तुस्थिती निश्चितच स्वागतार्ह आहे याबाबत लवकरच राज्यसरकारशी समन्वय साधुन धोरण ठरवू असे आश्वासन यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना ना. अश्विनी वैष्णव यांनी दिले.

दरम्यान, सातारा येथे आयटी हब निर्माण करण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे अत्यंत तळमळीने प्रश्न मांडत आहेत, त्यामध्ये निश्चित यश येईल अशी भावना युवकांनी बोलुन दाखवली आहे.
यावेळी काका धुमाळ,ॲड.विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते.
 

Adv