
सातारा नगरपालिकेने बऱ्याच वर्षांपासून बंद असलेल्या टपऱ्यांच्या विरोधात अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी सुध्दा सुरु होती. यावेळी मार्केट यार्ड पासून करंजे जकात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील एकूण ७ टपऱ्यांवरती कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी दिली.
जुना मोटर स्टॅन्ड येथील मंडईमध्ये जिथे गणेश मूर्ती नऊ दहा दिवस विराजमान असते त्यासमोरील किराणा मालाचे दुकानआत दुकानातील माल विक्रीसाठी रस्त्यावर अशी परिस्थिती असून यांच्यावर ही पालिकेने कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे
सविस्तर वृत्त असे की सातारा शहरांमध्ये बंद टपऱ्यांचे अतिक्रमणाविरोधात मागील दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. या टपऱ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी हा अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. सातारा पालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये सुद्धा पार्किंग व इतर विकासाच्या दृष्टीने जागा शिल्लक नाही. बहुतांश जागांमध्ये टपऱ्यांची अतिक्रमणे हा शहराच्या दृष्टीने विद्रूपीकरणाचा विषय आहे. आठ दिवसांपूर्वी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी बंद टपऱ्या तातडीने काढून घेतल्या जाव्यात संबंधित मालकांनी याची गंभीर दखल घ्यावी या टपऱ्या न हटवल्यास या टपऱ्या जप्त करून त्यांना दहा हजार रुपये दंड करण्यात येईल अशी सूचना प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली होती.
संबंधित टपरीधारकांना मुदत देऊनही काहीच हालचाल न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाई करत बुधवारी सुध्दा कारवाई चालू होती.. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम आणि पालिकेचे १५ कर्मचारी दोन डंपर सह येथील हुतात्मा उद्यान चौकात दाखल झाले. मार्केट यार्ड परिसर, एस टी स्टँड परिसर ते करंजे जकात नाका परिसरात कारवाई करत बंद टपऱ्या उचलण्यात आल्या. काही टपरी चालकांनी मध्यस्थी करून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र निकम यांनी कठोरपणे कारवाई सुरू ठेवत टपऱ्या जप्त करत पालिका आता थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व जप्त टपऱ्या हुतात्मा उद्यान येथील अग्निशमन केंद्राच्या परिसरात जमा करण्यात आल्या आहेत. आज सुध्दा हुतात्मा चौक कॉर्नर ते करंजे जकात नाका या परिसरात कारवाई सुरु असल्याचे निकम यांनी सांगितले.