फटाके विक्रीची परवानगी अखेर मिळाली

381
Adv

दिवाळी तोंडावर आली असताना फटाके विक्रीची परवानगी मिळत नसल्याने फटाके विक्रेते हतबल झाले होते. मात्र, गुरुवारी तहसीलदारांनी फटाके विक्रीचा परवाना देण्याचे मान्य केल्यानंतर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला.

साताऱ्यातील माची पेठेमध्ये काही दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दारूचा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता; तर चौघे जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर संबंधित व्यक्तीने विनापरवाना बेकायदेशीर मार्गाने दारूसाठा आणल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने विनापरवाना फटाके स्टॉलधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. काही जणांवर गुन्हेदेखील दाखल केले;

परंतु जे पूर्वीपासून वर्षानुवर्षे शासनाच्या परवानगीने फटाके विक्रीचा व्यवसाय करताहेत. त्यांच्यावर या कारवाईमुळे अन्याय होऊ लागल्याची भावना निर्माण होऊ लागली होती. दिवाळी काही दिवसांवर आली असताना शासनाकडून परवाना मिळत नव्हता. मात्र, गुरुवारी फटाके असोसिएशन आणि तहसीलदारांशी चर्चा झाल्यानंतर यातून तोडगा निघाला आहे. पूर्वीच्याच अटी व शर्तींवर फटाके विक्रेत्यांना परवाना देण्याचे मान्य केल्याचे फटाके असोसिएशनकडून सांगण्यात आले.

Adv