कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि कवी विंदा करंदीकर आणि कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतीदिनाचा योग साधून मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा पंधरवडयांची सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सलग अकराव्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
मराठी भाषा पंधरवडयाचे उद्घाटन रविवार 27 फेब्रुवारी रोजी नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 7.00 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. यावेळी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे मराठीतील विज्ञान लेखन आणि मी या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पंधरवडयातील दुसरा कार्यक्रम बुधवार 2 मार्च रोजी सायंकाळी 6.00 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. साहिर लुधियानवी प्रेम आणि क्रांतीचा उत्कट शायर या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मसाप,पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तर मसाप, पुणेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर, श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शनिवार 5 मार्च रोजी पंधरवडयातील तिसरा कार्यक्रम होणार आहे. यावेळी साता-यातील महिला कवयिंत्रींचे संमेलन होणार असून पाठक हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता हे कवि संमेलन होणार आहे. यामध्ये डॉ. आदिती काळमेख, शुभांग दळवी, डॉ. सुचित्रा काटकर, स्वाती माने, हर्षल राजेशिर्के, डॉ. संजीवनी केसकर-पिंगळे, संगीता केंजळे, कांता भोसले, डॉ. राजश्री देशपांडे, मानसी लाटकर सहभागी होणार आहेत. मसाप,पुणेचे कोषाध्यक्ष सौ. सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती असून सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत.
रविवार 13 मार्च रोजी पंधरवडयातील चौथा कार्यक्रम होणार असून सुप्रसिध्द कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनवट शांताबाई हा विशेष कार्यक्रम होणार असून वंदना बोकील-कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
रविवार 20 मार्च रोजी मराठी भाषा पंधरवडयाचा समारोप होणार असून यावेळी मराठी भाषा पंधरवडयाच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. हा बक्षीस समारंभ पुणे येथील विनय हर्डीकर यांच्याहस्ते होणार आहे. बक्षीस समारंभानंतर त्यांचे कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्याविषयी व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, मसाप, पुणेचे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, मसाप पुणे ग्रामीण प्रतिनिधी राजन लाखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडयाच्या सर्व कार्यक्रमास साता-यातील साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाह अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबेळकर आणि पदाधिका-यांनी केले आहे.