
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची नुकत्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्यावतीने विनोद कुलकर्णींचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. विनोद कुलकर्णी जनता सहकारी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख असून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमनही आहेत. सहकार क्षेत्राबरोबरच साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या इतिहासात या सर्वोच्च पदावर सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधीला पहिल्यांदाच ही अनमोल संधी प्राप्त झाली आहे. सातारा जिल्हयात यापूर्वी कोणालाही या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली नव्हती. त्यांच्या निवडीमुळे एकप्रकारे सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान झाला असून साता-याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी श्री. कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक मंडळ सदस्य जयेंद्र चव्हाण, माधव सारडा, अमोल मोहिते, सौ. सुजाता राजेमहाडिक, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके (सराफ), बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य ओंकार पोतदार, केतन जगदाळे, निमंत्रित संचालक अजित साळुंखे, सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री. विनोद कुलकर्णी यांनी सन 1993 मध्ये साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले गेले होते त्यानंतर 28 वर्षे एवढया प्रदीर्घ कालावधीत सातारा येथे ते भरवले गेले नाही याची खंत मनात असल्यामुळे मला विश्वस्तपदी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील पाच वर्षात सातारा येथे भरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी च्या माध्यमातून गेली दहा वर्षे साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामकाजाची माहिती दिली. सत्कार समारंभाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







