
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची नुकत्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. या पदावर सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधीला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. यापूर्वी कोणालाही या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली नव्हती. या निवडीमुळे एकप्रकारे सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान झाला आहे.
दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करुन विनोद कुलकर्णी यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले होते. गेली दहा वर्षे ते शाहूपुरी शाखेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. साडेपाच वर्षापूर्वी साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून ते विजयी झाले होते. सर्वाधिक तरुण जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. दहा वर्षात वेगवेगळे साहित्यविषयक उपक्रम राबवून त्यांनी सातारा जिल्ह्याचा नावलौकीक वाढवलेला आहे. सातारा साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा साहित्य संमेलन, युवा नाट्य साहित्य संमेलने साता-यात घेवून त्यांनी साहित्य क्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करुन त्याचे सलग दहा वर्षे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी महाबळेश्वर आणि दिल्ली येथे आंदोलने केली आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ लाखाहून अधिक पत्रे सातारा जिल्हावासियांनी पाठवलेली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा विषय अंतिम टप्प्यात पोहचलेला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत यापूर्वी त्यांनी विभागीय कार्यवाह, विभागीय साहित्य संमेलन, युवा नाट्य साहित्य संमेलन आणि समीक्षा संमेलनाचे निमंत्रक म्हणून काम पाहिले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर साहित्य परिषदेचा प्रतिनिधी म्हणून एक वर्षे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीने नव्हे तर निवडीने आणि सन्मानाने दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी महामंडळात केली होती आणि ती मान्यही झाली. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यीका अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर यांना सन्मानाने अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्या या सर्व कामकाजाची दखल घेवून साहित्य परिषदेत मोठ्या बहुमताने त्यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. एकुण झालेल्या मतप्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील ९५ टक्के सदस्यांनी त्यांना पाठींबा दर्शवला. एवढ्या कमी वयात यापूर्वी विश्वस्तपदाची जबाबदारी कोणालाही मिळालेली नव्हती.
या निवडीबद्दल विनोद कुलकर्णी यांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपानकाका चव्हाण, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांच्यासह साहित्य परिषदेच्या सर्वच जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधींनी, पुणे शहर प्रतिनिधी व कार्यवाह आणि शाहूपुरी शाखेच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
साहित्य संमेलनाचा कोष भक्कम करणार
भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वबळावर झाले पाहिजे यासाठी महामंडळाचा स्वनिधी वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम हातात घेणार आहे. साहित्य संमेलनासाठीचा कोष भक्कम करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. पाच वर्षासाठी विश्वस्त म्हणून जबाबदारी दिल्यामुळे साहित्य परिषद, पुण्याच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य यांचे मी मनापासून आभार मानतो. सातारा जिल्ह्याचा नावलौकीक यानिमित्ताने अखिल भारतीय पातळीवर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न माझ्याकडून केले जातील, अशी ग्वाही निवडीनंतर विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.






